LSG vs SRH Sunil Gavaskar: ‘लोक काय बोलतात याचा विचार करत नाही, त्याचं भविष्य उज्वल”, गावस्करांची लखनौच्या गोलंदाजाबद्दल भविष्यवाणी
LSG vs SRH Sunil Gavaskar: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत (IPL) लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) एक नवीन संघ आहे. यंदाच्या हंगामात पराभवाने त्यांची सुरुवात झाली.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत (IPL) लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) एक नवीन संघ आहे. यंदाच्या हंगामात पराभवाने त्यांची सुरुवात झाली. गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दुसऱ्या नव्या संघाकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर बलाढ्य चेन्नई सुपर किंग्सला नमवून त्यांनी जोरदार कमबॅक केलं. 211 धावांच्या विशाल लक्ष्याचा त्यांनी यशस्वी पाठलाग केला. क्विंटन डि कॉक आणि इविन लुईस या विजयात चमकले. कॅप्टन केएल राहुलने 40 धावांची खेळी केली. गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात लखनौने जखडून टाकणारी गोलंदाजी केली. पण चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात त्यांना गोलंदाजीत ती शिस्त दाखवता आली नाही. त्यांनी 200 पेक्षा जास्त धावा दिल्या. अनेक गोलंदाज महागडे ठरले. पण लखनौच्या एका गोलंदाजाने महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना प्रभावित केलं आहे. सुनील गावस्कर यांनी त्या गोलंदाजाचं विशेष कौतुक केलय.
येणाऱ्या दिवसात तो भारताकडून खेळताना दिसेल
आवेश खानने आपल्या गोलंदाजीने सुनील गावस्कर यांना प्रभावित केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचं तो भविष्य असल्याचं गावस्करांच मत आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत दोन सामन्यात त्याने प्रति षटक त्याने नऊपेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. आवेश खानकडून अपेक्षित गोलंदाजी होत नसली, तरी गावस्करांना त्याची गोलंदाजी आवडली आहे. आवेशने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात 1/33 आणि सीएसके विरुद्ध 2/38 गोलंदाजी केली. येणाऱ्या दिवसांमध्ये आवेश खान भारतीय संघाकडून खेळताना दिसेल, असा विश्वास सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला.
गावस्कर म्हणतात, त्याच भविष्य उज्वल आहे
“तुम्ही फलंदाजाला आऊट केलं, तर तुमचा आत्मविश्वास वाढतो. दुसऱ्याबाजूला फलंदाजाने तुमच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला, तर तुम्ही थोडे निराश होता. पण त्याचवेळी ते आव्हान सुद्धा असतं. मागच्या सांमन्यात माझ्या गोलंदाजीवर धावा लुटल्या. मी यांना माझी क्षमता दाखवून देईन अशी खूणगाठ सुद्धा गोलंदाज मनाशी बांधतो. आवेश खानकडे खूप चांगले भविष्य आहे. लोक त्याच्याबद्दल काय बोलतात, याचा मी विचार करत नाही. पण त्याचं भविष्य उज्वल आहे” असं गावस्कर स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाले.