टीम मधून वगळलं म्हणून उमरान मलिक शांत बसलेला नाही, पुढचं लक्ष्य आशिया कप
IPL 2022 मधील दमदार प्रदर्शनामुळे जम्मू एक्स्प्रेस उमरान मलिकला (Umran Malik) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये संधी मिळाली. दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली.
मुंबई: IPL 2022 मधील दमदार प्रदर्शनामुळे जम्मू एक्स्प्रेस उमरान मलिकला (Umran Malik) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये संधी मिळाली. दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी त्याची टीम इंडियात निवड झाली. त्याला तीन सामन्यात संधी सुद्धा मिळाली. पण त्याला अपेक्षित प्रभाव पाडता आली नाही. त्यामुळे वेस्ट इंडिज विरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांसाठी त्याला संघातून वगळण्यात आलं. आता मिळालेल्या ब्रेक मध्ये उमरान मलिक जम्मू काश्मीर क्रिकेट असोशिएशनच्या मल्टी-डे कप (Multi-Day Cup) स्पर्धेत खेळणार आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या आशिया कप 2022 स्पर्धेत संघात स्थान मिळवण्यासाठी त्याचा प्रयत्न असेल. काश्मीरचा दुसरा क्रिकेटपटू अब्दुल समदही या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
पाचही सामने बेंचवर बसून होता
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी 20 सीरीज मध्ये उमरान मलिक पाचही सामने बेंचवर बसून होता. आयर्लंड विरुद्ध त्याने डेब्यु केला. डेब्यु मॅच मध्ये त्याने पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा दिल्या. त्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्याने पुन्हा चेंडू त्याच्याहाती सोपवला नाही. दुसऱ्या टी 20 सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेट मध्ये पहिला विकेट मिळवला. पण चार षटकात त्याने 42 धावा दिल्या. इनसाइट स्पोर्ट्ने हे वृत्त दिलं आहे.
उमरान मलिक सर्वात महागडा गोलंदाज ठरला
डर्बीशायर विरुद्धच्या सराव सामन्यात त्याने चांगली कामगिरी केली. 31 धावात दोन विकेट घेतल्या. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. पण मालिकेतील विजयी आघाडीमुळे इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी त्याची निवड झाली. पण उमरान मलिक सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 56 धावा दिल्या.
रोहित शर्माच्या कौतुकानंतर उमरानला संघातून वगळलं
रोहित शर्माने सुद्धा उमरान मलिकच कौतुक केलं होतं. “उमरान आमच्या योजनेचा भाग आहे. उमरानला ज्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे, ते आम्ही त्याला समजावतोय. एक वेळ अशी येईल, जेव्हा आम्ही आमच्या युवा खेळाडूंना संधी देऊ. उमरान शानदार गोलंदाज आहे” असं रोहित म्हणाला होता. रोहित शर्माच्या कौतुकानंतर उमरानला संघातून वगळलं.