अरे देवा ! संन्यास घेतल्यानंतरही खेळाडूला 82 लाखांचा दंड; 8 आठवडे मॅच बंदी
झिम्बाब्वेचा प्रसिद्ध खेळाडू गॅरी बॅलन्स याला दंड ठोठावण्यात आला आहे. वर्णभेदाच्या आरोपावरून त्याला शिक्षा ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या क्रिकेट सामन्यातून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
नवी दिल्ली : सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून संन्यास घेणाऱ्या क्रिकेटपटू गॅरी बॅलेन्सला डबल झटका बसणार आहे. गॅरीला 82 लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच त्याच्यावर आठ आठवड्याची बंदी घालण्यात येणार आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने यॉर्कशर वर्णभेदाच्या प्रकरणानंतर हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे झिम्बॉब्वेचा खेळाडू गॅरीवर आठ आठवड्याची बंदी आणि दंड ठोठावण्याची शिफारस करण्यात आली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ही शिफारस केली आहे. त्यामुळे संन्यास घेतल्यानंतरही गॅरी बॅलन्स चांगलाच गोत्यात येणार आहे.
यॉर्कशरचा माजी गोलंदाज अजीम रफीक याने काही दिवसांपूर्वी धक्कादायक गौप्यस्फोट केले होते. मुस्लिम असल्या कारणाने आपल्याशी दुजाभाव करण्यात आला होता. काही खेळाडू आपल्याशी दुजाभाव करत होते. गॅरी बॅलन्स हा त्यापैकी एक आहे. गॅरीने आपल्याविरोधात वर्णभेदी भाषेचा वापर केला होता, असं अजीम रफिक याने म्हटलं आहे. त्याच्या या गौप्यस्फोटामुळे क्रिकेट जगातत एकच खळबळ माजली होती.
33 वर्षाचं करिअर
या प्रकरणाच्या सुनावणीवेळी झालेल्या खर्चामुळे ठोठावण्यात आलेला दंड कमी केला पाहिजे, असं गॅरीचे वकील क्रेग हॅरिस यांनी म्हटलं आहे. गॅरीने यॉर्कशरमध्ये त्याचं स्थान गमावलं आहे. एक स्पॉन्सरशीप कॉन्ट्रॅक्टही गमावलं आहे. त्याने गेल्याच महिन्यात संन्यास घेतला आहे, असंही वकील हॅरिस यांनी म्हटलं आहे. 2013मध्ये म्हणजे 33 वर्षापूर्वी गॅरीने इंग्लंडच्या संघातून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत 23 टेस्ट मॅच खेळल्या आहेत.
दोन देशांकडून खेळला
त्यानंतर गॅरीने झिम्बाब्वेच्या संघाकडून आपल्या करिअरची नवी सुरुवात केली होती. दोन देशांसाठी टेस्ट क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा तो दुसरा फलंदाज आहे. यापूर्वी केपलर वेसल्सने हा कारनामा केला होता. त्याने ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकासाठी खेळून शतक ठोकलं होतं. गॅरीने नेदरलँडसच्या विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 64 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता.
मी भाग्यशाली
संन्यास घेतल्यानंतर त्याने झिम्बाब्वे संघाचे आभार मानले होते. प्रोफेशनल दृष्ट्या क्रिकेट खेळण्याची माझी इच्छा आता राहिलेली नाही, अशा मनस्थितीत मी आहे. तरीही मी क्रिकेट खेळत राहिलो तर क्रिकेट आणि झिम्बाब्वेला न्याय देणार नाही. यॉर्कशायरसाठी काऊंटी चॅम्पियनशीप जिंकली. इंग्लंड आणि झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मला खेळण्याची संधी मिळाली. या गोष्टी मला करता आल्या त्यामुळे मी स्वत:ला भाग्यशाली समजतो, असं तो म्हणाला होता.