इंग्लंडच्या संघाने दोन दिवसांत जिंकला कसोटी सामना, ‘या’ खेळाडूने 6 चेंडूत 4 विकेट्स घेत केली कमाल
कसोटी सामना म्हटलं की तो पाच दिवसांचा असतो. कधी कधी 2-3 दिवसांतही निर्णय लागतो. पण इंग्लंडच्या संघाने एका कसोटी सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला केवळ दोन दिवसांत धुळ चारत विजय मिळवला होता.
लंडन : इंग्लंडचा संघ अगदी पूर्वीपासून कसोटी क्रिकेटला खूप महत्त्व देत असल्याचं आपण पाहिलं आहे. मग ते विविध देशांचे दौरे असो किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्धची मानाची एशेस सिरीज. अनेक वर्ष कसोटी क्रिकेट खेळल्याने इंग्लंड संघाने काही अप्रतिम विजयही स्वत:च्या नावे केले आहेत. यातीलच एक विजय म्हणजे पाच दिवसांचा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसांत संपवून इंग्लंड संघाने वेस्ट इंडिजवर दमदार विजय मिळवला होता. इंग्लंडने सामना एक डाव आणि 39 धावांनी विजयी केला होता. या सामन्याबद्दल आज सांगण्याचे कारण म्हणजे हा सामना 21 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 18 ऑगस्ट, 2000 रोजी खेळला गेला होता.
तर हा सामना 17 आणि 18 ऑगस्ट, 2000 रोजी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज (England vs West Indies) या संघामध्ये खेळवला गेला होता. ज्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत 172 धावा केल्या. ज्यात रामनरेश सरवनने नाबाद 59 केल्या होत्या. त्याच्याशिवाय इतर खेळाडूंना खास कामगिरी करता आली नाही. इंग्लंडकडून क्रेग व्हाइटने पाच तर डॅरेन गॉफने तीन बळी घेतले होते. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 272 धावांवर आटोपला. ज्यात माइकल वॉनने 76, ग्रेम हिकने 59 आणि ग्राहम थोर्पने 46 धावा केल्या. वेस्टइंडीजकडून कर्टली एंब्रोस आणि कर्टनी वॉल्शने चार-चार विकेट्स घेतले.
अवघ्या 61 धावांवर वेस्ट इंडीज सर्वबाद
ज्यानंतर वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्या डावात फलंदाजीला सुरुवात केली. बघता बघता वेस्ट इंडिजचे खेळाडू तंबूत परतू लागले आणि अवघ्या 61 धावांवर संघ सर्वबाद झाला. सर्वाधिक धावा कर्णधार जिमी एडम्सने (19) केल्या. पाच फलंदाज तर शून्यावर बाद झाले. ज्यामुळे इंग्लंडला एक डाव आणि 39 धावा अशा मोठ्या फरकाने विजय मिळाला. वेस्टइंडीजचा दुसरा डाव अवघ्या 61 धावांवर आटोपण्यात इंग्लंडच्या अँडी कॅडिक याचे पाच आणि डॅरेन गॉफ याचे चार विकेट्स महत्त्वाचे ठरले. कॅडिकने तर एका षटकातच चार फलंदाजाना तंबूचा रस्ता दाखवला होता.
इतर बातम्या
IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय
(England cricket team beat west indies in just two days at test match by inning and 39 runs in leeds)