टॅलेंटेड युवा खेळाडूने IPL 2022 मध्ये कोट्यवधी कमावण्याची ऑफर धुडकावली, त्याऐवजी काउंटीची निवड केली, कारण….
IPL 2022: रिप्लेसमेंट म्हणून साकिबला एका आयपीएल टीममधून खेळण्याची ऑफर होती. पण साकिबने काउंटी क्रिकेटमध्ये (County Cricket) लँकेशायरकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
मुंबई: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज साकिब महमूदने (Saqib Mahmood) IPL 2022 मध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. रिप्लेसमेंट म्हणून साकिबला एका आयपीएल टीममधून खेळण्याची ऑफर होती. पण साकिबने काउंटी क्रिकेटमध्ये (County Cricket) लँकेशायरकडून खेळण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या कसोटी संघातून खेळण्याचा दावा बळकट करण्यासाठी साकिबने काउंटीची निवड केली. 25 वर्षाच्या या खेळाडूने मार्च 2022 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेतून डेब्यू केला होता. 22.83 च्या सरासरीने त्याने सहा विकेट घेतल्या होत्या. साकिब महमूद स्विंग गोलंदाज आहे. जुन्या चेंडूने रिव्हर्स स्विंग करण्याची त्याची क्षमता आहे. इंग्लंडकडून तो 19 वनडे आणि टी 20 सामनेही खेळला आहे.
म्हणून IPL ची ऑफर धुडकावली
“लँकेशायरकडून खेळण्यासाठी आणि कसोटीमधील दावेदारी मजबूत करण्यासाठी मी आयपीएलची ऑफर धुडकावली. मी वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना, मला ऑफर आली होती. मला कुठलातरी एक निर्णय घ्यायचा होता. मी आसपासच्या लोकांशी बोललो. कसोटीवर लक्ष केंद्रीय करणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं” असं इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना साकिब म्हणाला.
‘त्या’ संघाचं नाव काय?
“कुठल्या IPL टीमकडून ऑफर आली होती, त्या संघाच नाव साकिबने सांगितलं नाही. निर्णय घेण्याआधी मी बेन स्टोक्स बरोबर चर्चा केली. स्टोक्सही कसोटी करीयरसाठी यंदा आयपीएलमध्ये खेळत नाहीय” असं साकिब म्हणाला.