IND W vs ENG W : एकदिवसीय सामन्यात कसोटीसारखी फलंदाजी, इंग्लंडचा भारतावर एकहाती विजय
टॅमी ब्यूमॉन्ट आणि अष्टपैलू नताली सिव्हर यांच्यात झालेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा आठ विकेट्स राखून पराभव केला.
लंडन : सलामीवीर टॅमी ब्यूमॉन्ट आणि अष्टपैलू नताली सिव्हर यांच्यात झालेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने (England Women Cricket Team) पहिल्या महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचा (Indian Women Cricket Team) आठ विकेट्स राखून पराभव केला. यजमान संघाने हा सामना 15.1 षटके शिल्लक राखून जिंकला. यासह त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. (England womens team defeated India womens team by 8 wickets)
मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला धिम्या फलंदाजीचा मोठा फटका सहन करावा लागला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) 108 चेंडूत 72 धावा केल्या तरी भारत निर्धारित 50 षटकांत 8 बाद 201 पर्यंत मजल मारू शकता. इंग्लंडसाठी हे मोठे लक्ष्य नव्हते आणि त्यांनी हे आव्हान अवघ्या 34.5 षटकांत 2 विकेट्सच्या बदल्यात 202 धावा करत पूर्ण केले. इंग्लंडच्या महिला संघाने हा सामना एकहाती जिंकला.
ब्युमॉन्ट (87 चेंडूत 87 धावा) आणि सिव्हर (74 चेंडूत 74 धावा) या दोघी इंग्लंडच्या या सोप्या विजयामागच्या नायिका ठरल्या. दोघींनी तिसर्या विकेटसाठी 119 धावांची नाबाद भागीदारी केली. ब्यूमॉन्टने 12 चौकार आणि एक षटकार तर सिव्हरने 10 चौकार आणि एक षटकार फटकावला. ब्युमॉन्टने सलग चौथे आणि कारकिर्दीतले 13 वे अर्धशतक फटकावले. तर सिव्हरने 15 वे अर्धशतक ठोकले. इंग्लंड लक्ष्याचा पाठलाग करत असताना झुलन गोस्वामी हिने पाचव्या षटकात लॉरेन विनफील्ड हिल (16) हिला विकेटकीपर तानिया भाटियाच्या हाती झेल द्यायला भाग पाडत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. परंतु ब्यूमॉन्टने संघावर दबाव वाढू दिला नाही. ब्युमॉन्टने दुसर्या विकेटसाठी कर्णधार हेदर नाइट (18) हिच्यासह 59 धावांची भागीदारी केली, ज्यामध्ये तिचे 41 धावांचे योगदान होते. अनुभवी एकता बिष्टने नाईटला बाद करत ही भागीदारी मोडली. त्यानंतर आलेल्या सिव्हरने केवळ ब्युमॉन्टला साथच दिली नाही, तर तिच्यापेक्षा वेगाने भारतीय गोलंदाजीवर हल्ला चढवला.
भारताची धिमी फलंदाजी
तत्पूर्वी कर्णधार मिताली राजने तिच्या कारकिर्दीतील 56 वे अर्धशतक झळकावत एकटीने इंग्लंडच्या गोलंजाजीचा सामना केला. एका बाजूने विकेट पडत असताना तिने किल्ला लढवला. परंतु तिच्या संयमी खेळीनंतरही भारतीय संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. 10 व्या षटकात मैदानात उतरलेल्या मितालीने 46 व्या षटकापर्यंत खिंड लढवली. तिने 108 चेंडूत 72 धावा केल्या, ज्यामध्ये सात चौकारांचा समावेश होता. तिसर्या विकेटसाठी पूनम राऊतसोबत (61 चेंडूंत 32 धावा) 56 धावांची (94 चेंडूत) भागीदारी केली. तर दीप्ती शर्मा (46 चेंडूत 30 धावा) हिच्यासोबत पाचव्या विकेटसाठी 65 धावांची (85 चेंडूत) भागीदारी केली. अखेरच्या 5 षटकात भारतीय संघाची धावगती खूपच कमी झाली होती. त्यामुळे भारतीय संघाला निर्धारित 50 षटकात केवळ 201 धावाच करता आल्या. पुरेशी धावगती न मिळाल्यामुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही.
188 चेंडू निर्धाव
मितालीने सुरुवातीला खूप धिमी फलंदाजी केली आणि त्यादरम्यान पूनमदेखील जलदगतीने खेळत नव्हती. भारतीय संघाने 16 षटकांत 50 धावा केल्या. यानंतर पूनम आणि हरमनप्रीत दोघीही एका धावेच्या अंतराने पव्हेलियनमध्ये परतल्या. त्यानंतर भारताची अवस्था 4 बाद 84 अशी झाली होती. मिताली विकेट राखून संयमी फलंदाजी करत होती. चौथी विकेट गेल्यानंतर तिने दीप्तीबरोबर चांगली भागीदारी रचली. दोघींनी स्ट्राइक रोटेट करण्यावर भर दिला. 40 षटकांनंतर भारताची धावसंख्या 4 बाद 134 अशी होती. यानंतर या दोघींनी फटकेबाजी सुरु केली. परंतु श्रबसोलेने दीप्तीला पायचित केलं. त्याच षटकात मितालीने मिडविकेटवर चौकार फटकावत आपले अर्धशतक पूर्ण केले होते.
अंतिम षटकांमध्ये हाराकिरी
मिताली शेवटपर्यंत क्रीजवर थांबू शकली नाही. तिने श्रबसोलेच्या पुढच्या षटकात सलग दोन चौकार ठोकले परंतु एक्लेस्टोनच्या आर्म बॉलचा नीट अंदाज न लावता आल्याने ती त्रिफळाचित झाली. ती 46 व्या षटकात बाद झाली. मिताली बाद झाल्यानंतर उर्वरित 27 चेंडूत भारताला केवळ 21 धावाच करता आल्या. अंतिम क्रमांकावरील फलंदाजांमध्ये पूजा वस्त्राकर (15) हीने काही काळ प्रतिकार केला. पण दुसऱ्या कोणत्याही फलंदाजाला मोठे फटके मारता आले नाहीत.
इतर बातम्या
“विराट कोहलीला कर्णधारपदावरुन हटवणं क्रिकेटमधील अपराध ठरेल”
WTC Final मध्ये ‘या’ खेळाडूला खेळवणं भारताची चूक, माजी क्रिकेटपटूने केला मोठा दावा
(England womens team defeated India womens team by 8 wickets)