Asia Cup 2022 आधी पाकिस्तानी गोलंदाजाची फुकटची बडबड, विराट कोहलीला दिला सल्ला
Asia Cup 2022: भारत आणि पाकिस्तानचा सामना 28 ऑगस्टला होणार आहे. या मॅच मध्ये कोहलीचेही मैदानावर पुनरागमन होईल.
मुंबई: माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून ब्रेक घेतला आहे. आशिया कप 2022 (Asia cup) मधून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पुनरागमन करणार आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना 28 ऑगस्टला होणार आहे. या मॅच मध्ये कोहलीचेही मैदानावर पुनरागमन होईल. मागच्यावर्षी कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा टी 20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून (Pakistan) पराभव झाला होता. सध्या कोहली फॉर्म मध्ये नाहीय. त्यांच्या बॅटमधून शेवटच शतक निघून 1 हजार पेक्षा जास्त दिवस झालेत.
कोहलीने फलंदाजीवर लक्ष द्यावं
कोहलीने शेवटच शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेश विरुद्ध कसोटी सामन्यात झळकवलं होतं. कोहलीला आशिया कप मधून दमदार पुनरागमन करायचं आहे. चाहते सुद्धा त्याच्याकडून पाकिस्तान विरुद्ध शतकाची आस बाळगून आहेत. त्यासाठी कोहली सुद्धा मैदानात मेहनत घेतोय. कोहलीच्या या ब्रेकवर पाकिस्तानचा माजी खेळाडू दानिश कनेरिया उगाच नको तेवढ बोलला. “कोहलीने फॉर्म मध्ये परतण्यासाठी ही सीरीज खेळायला पाहिजे होती. आयपीएल मधून ब्रेक घ्यायला पाहिजे होता” असं कनेरिया म्हणाले. “मला वाटतं कोहलीला क्रिकेटवर फलंदाजीवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अजून काही वर्ष खेळायचं असेल, तर कामगिरीत सातत्य आवश्यक आहे” असे कनेरिया म्हणाले.
ब्रेक घेऊन कोहलीने चूक केली
दानिश कनेरिया यांच्यामते, कोहलीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून ब्रेक घेऊन चूक केली. “कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी काही आयपीएल सामन्यांवर पाणी सोडायला हवं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अनुभवच त्याला फॉर्म परत मिळवून देऊ शकतो. वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीज महत्त्वाची होती. त्याने खेळायला पाहिजे होतं” असं कनेरिया म्हणाले.