सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेपूर्वीच मुंबई संघावर संकट, संघातील 4 खेळाडू कोरोनाबाधित
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही भव्य स्पर्धा 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पण सुरु होण्यापूर्वीच या स्पर्धेवर कोरोनाचं संकट आल्याचं दिसून येत आहे.
मुंबई: कोरोनाचं संकट अजूनही पूर्णपणे गेलेलं नाही. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलेला आहे. देशांतर्गत होणाऱ्या सर्वात मोठ्या टी-20 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच कोरोनाने डोकं वर काढलं आहे. 4 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy) मुंबई संघातून खेळणाऱ्या 4 खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली आहे. या भव्य स्पर्धेसाठी सर्व राज्यांनी आपआपले संघ जाहीर केले असताना मुंबईने (Mumbai Cricket Team) देखील संघाची घोषणा केली. पण आता यात बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.
विश्वासू सूत्रांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितलं आहे की,‘‘मुंबईच्या संघातील 4 खेळाडू कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये शम्स मुलानी, साइराज पाटील, प्रशांत सोलंकी आणि सरफराज खान यांचा समावेश आहे.” 4 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत मुंबईचा संघ ग्रुप बी मध्ये असून त्यांचा पहिला सामना कर्नाटक संघासोबत असणार आहे. कोरोनाबाधित आढळलेल्यांपैकू सरफराज हा आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाकडून खेळतो.
चार नव्या खेळाडूंचा लवकरच घोषणा
कोरोनाच्या शिरकावामुळे मुंबई क्रिकेट संघ (एमसीए) आता या चार खेळाडूंजागी नव्या खेळाडूंना संधी देणार आहे. या खेळाडूंच्या नावांची घोषणा लवकरच केली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘‘नव्या खेळाडूंचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यास लवकरच ते संघासोबत जोडले जाणार आहेत.’’
ऋतुराजकडे मोठी जबाबदारी
दरम्यान याच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेत चेन्नई सुपरकिंग्सचा धडाकेबाज खेळाडू ऋतुराज गायकवाड (Ruturaj gaikwad) महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दिसणार आहे. महाराष्ट्राला एलिट गट अ मध्ये ठेवण्यात आले आहे आणि हा संघ लीग स्टेजचे सामने लखनौमध्ये खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना तामिळनाडूशी होणार आहे. IPL 2021 मध्ये सर्वाधिक धावा करून ऑरेंज कॅप जिंकणारा ऋतुराज गायकवाड या स्पर्धेत आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर T20 विश्वचषकानंतरच्या न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघाचं दारही ठोठावू शकतो.
इतर बातम्या
T20 World Cup: महत्त्वाच्या सामन्याआधी आफ्रिकेच्या डिकॉकची सामन्यातून माघार, कारण ऐकून थक्क व्हाल!
मोठी बातमी: टीम इंडियाच्या हेड कोच पदासाठी राहुल द्रविडचा अर्ज, टी20 वर्ल्डकपनंतर सांभाळणार जबाबदारी
T20 World Cup 2021: वेस्ट इंडिजचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिकेने 8 गडी राखून दिली मात
(four players in mumbai team tested covid positive before Syed Mushtaq Ali T20)