गौतम गंभीर कोणाला दुखावणार? भारत की KKR? शाहरुखने थेट दिला ‘ब्लँक चेक’
'केकेआर'चा मार्गदर्शक गौतम गंभीर कोणता निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हेड कोच पदाचा स्वीकार करण्यापूर्वी त्याला शाहरुख खानसोबत चर्चा करावी लागणार आहे. कारण किंग खानने त्याला ब्लँक चेकची ऑफर दिली होती.
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या 17 व्या हंगामात ‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघाने विजय मिळवला. विजयावर आपलं नाव कोरून मार्गदर्शक गौतम गंभीरने केकेआरला ‘आयपीएल 2024’चं चॅम्पियन बनवलं आहे. त्यामुळे आता निश्चितपणे त्याला टीम इंडियाचा हेड कोच (मुख्य प्रशिक्षक) बनवण्याची शक्यता वाढली आहे. राहुल द्रविडनंतर हेड कोच म्हणून बीसीसीआयच्या दावेदारांच्या यादीत गौतम गंभीर अग्रस्थानी आहे. गौतम गंभीरने हेड कोचच्या पदासाठी स्वारस्य दाखवलं असलं तरी अद्याप त्याने या पदासाठी औपचारिकरित्या अर्ज केलेला नाही. अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 27 मे आहे. यादरम्यान अशी जोरदार चर्चा आहे की ‘केकेआर’ संघाचा सहमालक शाहरुख खानने गौतम गंभीरला ब्लँक चेक दिला होता.
‘दैनिक जागरण’ने दिलेल्या वृत्तानुसार, हेड कोच पदासाठी अर्ज करण्याबाबत गंभीरने बीसीसीआयशी संपर्क साधला होता आणि त्याविषयी उत्सुकता दाखवली होती. रविवारी एकीकडे आयपीएलचा अंतिम सामना असताना तो चेन्नईमध्ये काही बीसीसीआयच्या प्रमुखांना भेटणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र हेड कोच पदासाठी अर्ज करण्यापूर्वी गौतम गंभीरला केकेआरचा सहमालक शाहरुख खानसोबतही चर्चा करावी लागणार आहे. या वृत्तात असाही दावा करण्यात आला आहे की शाहरुखने आयपीएलच्या सिझनपूर्वी गंभीरची भेट घेतली होती आणि त्याला ब्लँक चेक ऑफर करत पुढील दहा वर्षांसाठी केकेआरचं व्यवस्थापन आपल्या हाती घेण्यास सांगितलं होतं. यावरूनच असं दिसतंय की शाहरुख गौतम गंभीरला कोणतीही रक्कम देण्यास तयार आहे.
गौतम गंभीरने आयपीएलमध्ये मेंटॉर म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 2022 मध्ये त्याला लखनऊ सुपर जायंट्सची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या टीमने प्लेऑफ केल्यानंतर लीग स्टेजमध्ये बॅक-टू-बॅक सिझनमध्ये तिसरं स्थान मिळवलं होतं. गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली. तर याआधी केकेआरचा कर्णधार म्हणूनही त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. मार्गदर्शक म्हणूनही त्याने दमदार कामगिरी करून दाखवली. यंदाच्या सिझनमध्ये केकेआर हा पूर्णपणे वेगळाच संघ दिसला. संपूर्ण लीगदरम्यान त्याने कोणत्याही संघाला आपल्यापुढे टिकू दिलं नाही. सध्या गौतम गंभीरला भारतीय संघासोबत काम करायचं असेल तर शाहरुख खानशी चर्चा करावी लागणार आहे. या चर्चेनंतर तो काय निर्णय घेतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.