दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धोपटणारा पुण्याचा Ruturaj Gaikwad आपल्या फलंदाजीवर म्हणाला….
पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने (Rututaj gaikwad) अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप उमटवली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टनम येथे झालेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (Third T 20 match) त्याने अर्धशतक झळकावलं.
मुंबई: पुण्याच्या ऋतुराज गायकवाडने (Rututaj gaikwad) अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली छाप उमटवली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टनम येथे झालेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (Third T 20 match) त्याने अर्धशतक झळकावलं. या सामन्याआधी ऋतुराजला पाच टी 20 सामन्यात संधी मिळाली होती. तिथे त्याला फारच कमी धावा करता आल्या होत्या. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) त्याची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. भारताने या सामन्यात विजय मिळवल्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत आव्हान अजून कायम आहे. ऋतुराज गायकवाडने 35 चेंडूत 57 धावा फटकावल्या. इशान किशनसोबत पहिल्या विकेटसाठी 10 षटकात 97 धावांची भागीदारी केली. त्याने आक्रमक सुरुवात करुन दिली. ऋतुराजच्या सुरुवातीमुळे भारताने संपूर्ण सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर वर्चस्व गाजवलं. त्याने सात चौकार आणि दोन षटकार लगावले.
बेफिकीरी किंवा उतावळेपणा नव्हता
“दक्षिण आफ्रिकन बॉलर्सवर जो हल्ला चढवला, त्यामागे बेफिकीरी किंवा उतावळेपणा नव्हता. फलंदाजी युनिट म्हणून आपल्याकडे क्षमता आहे. प्रत्येक फलंदाज काही फटके खेळू शकतो” असं ऋतुराज म्हणाला. “तुम्ही पहिला चेंडू खेळा, दुसरा किंवा तुम्ही सेट झाला आहात, तुम्ही तुमचा इरादा दाखवून देण आवश्यक आहे. तुम्ही 30-40 धावांवर खेळताय, तुमची क्षमता आहे, तुम्ही सहज शॉट खेळू शकता, तर फटका खेळला पाहिजे, आम्ही त्या विचाराने खेळलो” असं ऋतुराज म्हणाला. ‘मागचं वर्ष माझ्यासाठी चांगलं होतं. त्यामुळे लोकांना माझ्याकडून अपेक्षा होत्या’ असं ऋतुराज म्हणाला.
यंदाच्या आयपीएलमध्ये अपेक्षित कामगिरी नाही
यावर्षी आयपीएलमध्ये ऋतुराज गायकवाडला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने 14 सामन्यात 368 धावा केल्या. यात तीन फिफ्टी आहेत. ऋतुराज चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो.
आयपीएलमध्ये काय गडबड झाली, ते सांगितलं
“आयपीएलमध्ये काही खेळपट्टया गोलंदाजांना अनुकूल होत्या. फ्लॅट विकेट नव्हती. चेंडू वळायचे, त्यांना वेग असायचा. त्याशिवाय चेंडूही स्विंग व्हायचे. त्यामुळे आयपीएलमध्ये तीन-चार सामन्यात मी, चांगल्या चेंडूवर आऊट झालो. काही चांगले फटके क्षेत्ररक्षकांच्या हातात गेले. टी 20 क्रिकेटचा हा भाग आहे” असं ऋतुराज म्हणाला.