Hardik Pandya: संजू सॅमसनला का संधी दिली नाही? पंड्याने सांगितलं त्यामागचं कारण…
हार्दिक म्हणाला, कोण दु:खी असेल, तर त्याने....
नेपियर: न्यूझीलंडमध्ये T20 सीरीज जिंकल्यानंतर हार्दिक पंड्याला एक प्रश्न विचारण्यात आला. तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुद्धा पडलेला हा प्रश्न आहे, असं म्हटल्यास हरकत नाही. शेवटच्या टी 20 सामन्यात उमरान मलिक आणि संजू सॅमसनला संधी का दिली नाही? हार्दिक पंड्याने या प्रश्नावर उत्तर दिलय. “रणनीतिक कारणांमुळे सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. कोण दु:खी असेल, तर चर्चेसाठी दरवाजे नेहमी उघडे आहेत” असं हार्दिकने सांगितलं.
माझा विश्वास नाही
“प्रत्येक खेळाडूला पुरेशा संधी मिळतील. अजून बराच वेळ बाकी आहे. ही तीन मॅच ऐवजी मोठी सीरीज असती, तर नक्कीच आम्ही त्यांना संधी दिली असती. कमी सामने असलेल्या सीरीजमध्ये फार बदल करण्यावर माझा विश्वास नाही” असं हार्दिक म्हणाला.
मला भावना कळतात
“माझे सर्व खेळाडूंसोबत चांगले संबंध आहेत. ज्यांना संधी मिळाली नाहीय, त्यांना माहितीय, हे काही व्यक्तीगत कारण नाही. टीम कॉम्बिनेशनमुळे त्यांना संधी मिळालेली नाही. जर कुठल्या खेळाडूला यापेक्षा काही वेगळं वाटत असेल, तर माझे दरवाजे नेहमी उघडे आहेत. ते माझ्याशी बोलू शकतात. मला त्यांच्या भावना माहित आहेत” असं हार्दिकने सांगितलं.
सॅमसनचा विषय दुर्भाग्यपूर्ण
“सॅमसनचा विषय दुर्भाग्यपूर्ण आहे. आम्हाला त्याला खेळवायच होतं. पण रणनीतिक कारणांमुळे तो प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळवू शकला नाही” असं हार्दिक म्हणाला.
सॅमसनला 7 वर्षात फक्त इतक्या मॅचमध्ये संधी
संजू सॅमसनने टीम इंडियासाठी 2015 साली टी 20 मध्ये डेब्यु केला. मागच्या सात वर्षात हा खेळाडू भारताकडून फक्त 16 टी 20 सामने खेळलाय. त्याच्या नावावर फक्त 10 वनडे सामने आहेत. दुसऱ्याबाजूला पंतला अपयशी ठरुनही अनेक संधी मिळाल्या आहेत.