IND vs IRE: Umran Malik ला शेवटच्या ओव्हरपर्यंत का राखून ठेवलं? हार्दिक पंड्याने सांगितलं कारण…
भारत आणि आयर्लंडमध्ये (IND vs IRE) काल झालेला दुसरा टी 20 सामना खूपच रोमांचक ठरला. भारताने 225 धावांचा डोंगर उभारुनही नवख्या आयरिश संघाने 221 धावांपर्यंत मजल मारली.
मुंबई: भारत आणि आयर्लंडमध्ये (IND vs IRE) काल झालेला दुसरा टी 20 सामना खूपच रोमांचक ठरला. भारताने 225 धावांचा डोंगर उभारुनही नवख्या आयरिश संघाने 221 धावांपर्यंत मजल मारली. भारताने फक्त 4 धावांनी हा सामना जिंकला. दीपक हुड्डाच (Deepak Hooda) शानदार शतक, संजू सॅमसनची अर्धशतकी खेळी आणि त्याच बरोबर उमरान मलिकने (Umran Malik) टाकलेल्या शेवटच्या षटकामुळे भारताला आयर्लंड विरुद्धची ही मालिका 2-0 ने जिंकता आली. भारताकडे भुवनेश्वर कुमार सारखा अनुभवी गोलंदाज असतानाही, उमरान मलिक सारख्या नवख्या गोलंदाजाकडे हार्दिकने शेवटची ओव्हर का दिली? असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. लास्ट ओव्हरमध्ये आयर्लंडला विजयासाठी 17 धावांची आवश्यकता होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दुसराच टी 20 सामना खेळणाऱ्या उमरानकडे हार्दिकने चेंडू सोपवला. उमरानने देखील आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.
हेच त्याला गोलंदाजी देण्यामागच मुख्य कारण
उमरानला शेवटची ओव्हर का दिली? त्याचा उलगडा हार्दिकने सामन्यानंतर केला. उमरान मलिककडे पेस आहे, हेच त्याला गोलंदाजी देण्यामागच मुख्य कारण असल्याच हार्दिक म्हणाला. उमरानच्या वेगवान चेंडूंचा सामना करणं, हे फलंदाजांसाठी कठीण होतं, असं हार्दिक म्हणाला. आयर्लंडला विजयी लक्ष्यापर्यंत पोहोचू दिलं नाही, या बद्दल हार्दिकने उमरानचं कौतुक केलं.
माझ्या मनात कुठलीही भिती नव्हती
“शेवटच षटक उमरानला देताना प्रामाणिकपणे सांगतो, माझ्या मनात कुठलीही भिती नव्हती. उमरानकडे वेग आहे. म्हणून मी चेंडू त्याच्या हातात दिला. त्याच्या वेगवान चेंडूंवर फटकेबाजी करणं, सोपं नाहीय. आम्ही इथे क्रि्केट खेळायला आलो होतो. आयर्लंडचा संघ कसा क्रिकेट खेळतो, त्यांच्याकडे किती प्रतिभा आहे, ते आम्हाला दिसलं. त्यांनी खरोखर काही चांगले शॉट्स खेळले, त्याच श्रेय त्यांना जातं. त्याचवेळी आमच्या गोलंदाजांना सुद्धा विजयाचं श्रेय जातं” असं हार्दिक म्हणाला.
दीपक हुड्डाचं कौतुक
55 चेंडूत शतक झळकावणाऱ्या दीपक हुड्डाचं सुद्धा हार्दिक पंड्याने कौतुक केलं. त्याच्यामुळे भारताला 225 एवढी विशाल धावसंख्या उभारता आली. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आलं.