World Cup 2023 | Hardik pandya च्या जागी ‘या’ खेळाडूसाठी उघडले टीमचे दरवाजे
World Cup 2023 | हार्दिक पांड्या वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर गेलाय. दुखापतीमुळे हार्दिक पांड्या टीममधून आऊट झालाय. त्याच्याजागी दुसऱ्या खेळाडूची टीममध्ये निवड करण्यात आलीय. वर्ल्ड कप महत्त्वाच्या टप्प्यावर असताना टीममध्ये हा बदल झालाय. टीम इंडिया आतापर्यंत सात सामने खेळली असून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबई : टीम इंडियाला आज एक मोठा धक्का बसला. टीमचा प्रमुख प्लेयर वनडे वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर गेलाय. हार्दिक पांड्या आता वनडे वर्ल्ड कप 2023 चे उर्वरित सामने खेळू शकणार नाहीय. हार्दिक पांड्याच्या अँकलला झालेली दुखापत गंभीर आहे. त्यामुळे तो वनडे वर्ल्ड कप 2023 मधून बाहेर गेलाय. बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला ही दुखापत झालेली. हार्दिक पांड्या टीमचा ऑलराऊंडर प्लेयर आहे. चालू वर्ल्ड कपमध्ये त्याने गोलंदाजीत दमदार कामगिरी केलेली. टीमला गरज असताना बॅटिंग करण्याची त्याची क्षमता होती. कुठल्याही टीमला असा प्लेयर गरजेचा असतो. त्यामुळे हार्दिक पांड्याच बाहेर होणं, ही टीमची मोठी हानी आहे. हार्दिक पांड्याची जागा घेणारा त्या ताकतीचा दुसरा ऑलराऊंडर टीम इंडियाकडे नाहीय.
शार्दुल ठाकूरला हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणता येणार नाही. कारण हार्दिकची क्षमता शार्दुलपेक्षा खूप मोठी आहे. शार्दुलला या वर्ल्ड कपमध्ये संधी मिळाली. पण तो प्रभावी गोलंदाजी करु शकला नाही. त्याच्या गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी टीमने आरामात धावा वसूल केल्या. हार्दिकप्रमाणे शार्दुलच्या वाट्यालाही फारशी फलंदाजी आली नाही. त्यामुळे शार्दुलकडे हार्दिकचा पर्याय म्हणून पाहता येणार नाही. आज हार्दिक पांड्या टीममध्ये नाहीय, त्यावेळी कॅप्टन रोहित शर्माला त्याच्याजागी दोन खेळाडू खेळवावे लागतायत. यावरुन हार्दिक पांड्याची ताकत लक्षात येते. हार्दिक न्यूझीलंड, श्रीलंका आणि इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्यावेळी त्याच्या जागी सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी या दोघांचा टीममध्ये समावेश करण्यात आला.
हार्दिकच्या जागी संधी मिळालेल्या प्लेयरचा परफॉर्मन्स कसा आहे?
निवड समितीने हार्दिक पांड्याच्या जागी आता प्रसिद्ध कृष्णाचा टीममध्ये समावेश केलाय. आयसीसीच्या टेक्निकल समितीने हार्दिकच्या जागी प्रसिद्ध कृष्णाच्या समावेशाला हिरवा कंदिल दाखवलाय. कोलकाता येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी प्रसिद्ध कृष्णा उपलब्ध असेल. प्रसिद्ध कृष्णा आतापर्यंत टीम इंडियाकडून 17 वनडे सामने खेळलाय. त्याने 25.59 च्या सरासरीने 29 विकेट काढल्या आहेत. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी सध्या जबरदस्त कामगिरी करतायत. त्यांच्याजागी लगेच प्रसिद्ध कृष्णाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.