टी20 वर्ल्डकप विजेत्या संघाला किती कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार सुरु झाला आहे. प्रत्येक सामन्यानंतर आता स्पर्धेचं चित्र बदलताना दिसणार आहे. साखळी फेरीत 12 संघांचा प्रवास थांबेल. तर आठ संघ पुढच्या प्रवासाला लागणार आहे. असं असताना या स्पर्धेतील विजेत्या संघाला किती कोटी रुपये मिळणार याची उत्सुकता लागून आहे. चला जाणून घेऊयात कोणाला किती रक्कम मिळणार ते
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेकडून टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. आतापर्यंत या स्पर्धेतील तीन सामने पार पडले आहेत. असं असताना आयसीसीने या स्पर्धेतील बक्षिसी रकमेची घोषणा सोमवारी (3 जून) केली आहे. या स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघावर पैशांचा पाऊस पडणार आहे. आयसीसीने सांगितलं की, यावेळी बक्षिसी रकमेत 93.51 कोटी रुपये खर्च होतील. मागच्या वेळी ऑस्ट्रेलियात ही स्पर्धा पार पडली होती तेव्हा इंग्लंडला 12 कोटी रुपये मिळाले होते. यावेळेस ही रक्कम जवळपास दुप्पट झाली आहे. विजेत्या संघाला 20.36 कोटी रुपये मिळणार आहे. आयपीएल चॅम्पियन संघाच्या तुलनेत ही रक्कम 36 लाखांनी जास्त आहे. आयपीएल विजेत्या संघ कोलकाता नाईट रायडर्स संघाला 20 कोटी रुपये मिळाले होते. वनडे वर्ल्डकप विजेत्या संघाला 33 कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती. 2023 वनडे वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. उपविजेत्या भारताला 16.59 कोटी रुपये मिळाले होते.
स्पर्धेतील उपविजेत्या संघाला 10.63 कोटी रुपये मिळतील. तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला 6.54 कोटी रुपये मिळणार आहेत. सुपर 8 फेरीतील संघांना 3.17 कोटी रुपयांची रक्कम मिळेल. तर नऊ ते 12 व्या स्थानावर असलेल्या संघांना 2 कोटी रुपये मिळतील. त्याचबरोबर 13 व्या स्थानापासून 20व्या स्थानावर असलेल्या संघांना 1.87 कोटी रुपये मिळतील. या व्यतिरिक्त उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी जिंकणाऱ्या संघांना सोडून प्रत्येक सामन्यातील विजयासाठी अतिरिक्त 25.89 लाख बक्षिसी रक्कम मिळेल. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 55 सामने खेळले जातील. साखळी फेरीत 40 सामने खेळले जातील. त्यानंतर सुपर 8 फेरीचा थरार रंगेल. सुपर 8 फेरीत 12 सामने होतील. उपांत्य फेरी आणि अंतिम सामन्याची लढत होईल.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच 20 संघ सहभागी झाले आहेत. अ गटात अमेरिका-कॅनडा-भारत-आयर्लंड- पाकिस्तान हे संघ आहेत. ब गटात नामिबिया-ओमान-ऑस्ट्रेलिया-इंग्लंड-स्कॉटलंड हे संघ आहेत. क गटात वेस्ट इंडिज-पापुआ न्यू गिनी-अफगाणिस्तान-न्यूझीलंड-युगांडा हे संघ आहेत. ड गटात बांगलादेश-दक्षिण अफ्रिका-श्रीलंका-नेपाळ-नेदरलँड हे संघ आहेत. या स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना 29 जूनला खेळला जाणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होईल. त्यानंतर 9 जूनला पाकिस्तान, 12 जूनला अमेरिका आणि 15 जूनला कॅनडाशी लढत होईल. टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना 29 जूनला आहे.