World Cup: महेंद्रसिंह धोनीच्या टीमला 2011 मध्ये किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
टी-20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडियावर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. नुकतंच बीसीसीआयने टीमसाठी 125 कोटी रुपयांची घोषणा केली. ही रक्कम 15 मेंबर्सच्या टीममध्ये वितरित केली जाणार आहे.
ट्वेंटी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरल्यानंतर भारतीय क्रिकेट टीमवर बक्षिसांचा वर्षाव झाला. आयसीसी टी-20 वर्ल्ड कप ट्रॉफी पटकावणाऱ्या टीम इंडियाला तब्बल 15 दशलक्ष डॉलर मिळणार आहेत. बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानात पार पडलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. टीम इंडियासाठी टी-20 वर्ल्ड कप पटकावणारा रोहित शर्मा हा दुसरा कर्णधार आहे. याआधी महेंद्रसिंह धोनीने ही अभूतपूर्व कामगिरी केली होती. विजयानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी 125 कोटी रुपये बक्षिसाची रक्कम जाहीर केली. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या 2011 च्या बॅचला बोनस म्हणून दिलेल्या एकूण आकड्याच्या तिप्पट ही रक्कम आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये दुसरं विश्वचषक जिंकलं होतं. ‘स्पोर्टस्टार’ने दिलेल्या वृत्तानुसार, त्यावेळी टीम इंडियाच्या प्रत्येक सदस्याला 2 कोटी रुपये दिले गेले होते.
निवड करणाऱ्यांना बोनस
निवड करणाऱ्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचा बोनस मिळाला होता. तर 2011 च्या यशस्वी मोहिमेनंतर प्रशिक्षक आणि सपोर्ट स्फाफ मेंबर्सना प्रत्येकी 50 लाख रुपये देण्यात आले होते. या वृत्तात असंही म्हटलंय की 2011 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये भारताने श्रीलंकेवर विजय मिळवल्यानंतर प्रोत्साहन (Incentive) म्हणून 39 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते.
Watch out for those moves 🕺🏻
Wankhede was a vibe last night 🥳#T20WorldCup | #TeamIndia | #Champions pic.twitter.com/hRBTcu9bXc
— BCCI (@BCCI) July 5, 2024
यंदाच्या वर्षी इन्सेन्टिव्हची ही रक्कम 3.2 पटीने वाढवण्यात आली आहे. बीसीसीआयने 2011 च्या वर्ल्डकपसाठी प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपये इन्सेन्टिव्ह जाहीर केलं होतं. या रकमेवर खेळाडूंनी नाराजी व्यक्त केल्यानंतर ती दुपटीने वाढवून प्रत्येक खेळाडूसाठी 2 कोटी रुपये करण्यात आली होती.
1983 मध्ये किती मिळाली होती बक्षिसाची रक्कम?
भारताने 1983 मध्ये जेव्हा वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा प्रत्येक खेळाडूला 25 हजार रुपये मिळाले होते, असं दिलीप वेंगसरकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं. त्यामुळे गेल्या काही वर्षांत बक्षिसाच्या रकमेत किती वाढ झाली, हे स्पष्ट पहायला मिळतंय.