Shikhar Dhawan Divorce | दोन मुलींची आई, दहा वर्षांनी मोठी, तरीही फेसबुकवरील फोटोंनी ‘बोल्ड’, कशी बहरली धवन-आयेशाची प्रेमकहाणी?
शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांची प्रेमकथा अत्यंत अनोखी आहे. खेळांवरील प्रेमापासून ते टॅटूच्या आवडीपर्यंत, दोघांना एकमेकांमध्ये खरं प्रेम सापडलं होतं. मिश्यांना पीळ देत फिरणारा हा क्रिकेटपटू बंगाली ब्युटीला कसा भेटला, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे.
मुंबई : टीम इंडियाचा ‘गब्बर’ ओपनर शिखर धवनने (Shikhar Dhawan) घटस्फोट घेतला असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. पत्नी आयेशा मुखर्जीची (Aesha Mukerji) पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयेशाने एक भावनिक पोस्ट लिहून घटस्फोटाशी संबंधित गोष्टी शेअर केल्या आहेत. विवाहित, पदरात दोन मुली आणि वयात दहा वर्षांचं अंतर… अशी पार्श्वभूमी असतानाही शिखर आयेशाच्या प्रेमात पडला होता.
शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांची प्रेमकथा अत्यंत अनोखी आहे. खेळांवरील प्रेमापासून ते टॅटूच्या आवडीपर्यंत, दोघांना एकमेकांमध्ये खरं प्रेम सापडलं होतं. मिश्यांना पीळ देत फिरणारा हा क्रिकेटपटू बंगाली ब्युटीला कसा भेटला, असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे.
कोण आहे आयेशा मुखर्जी?
आयेशा मुखर्जीचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला. ती अँग्लो-इंडियन आहे, कारण तिचे वडील भारतीय बंगाली आहेत, तर तिची आई इंग्रजी वंशाची आहे. आयेशा अवघ्या 8 वर्षांची असताना तिचं कुटुंब ऑस्ट्रेलियाला स्थायिक झालं. आयेशाच्या खेळावरील प्रेमामुळे तिला क्रिकेट, फुटबॉल आणि इतर प्रमुख खेळांची ओळख झाली होती, पण तिला किक बॉक्सिंगमध्ये विशेष आवड निर्माण झाली. ती प्रशिक्षित किक बॉक्सर आहे.
ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाशी पहिला विवाह
आयेशाचे पहिले लग्न एका ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाशी झाले होते. या जोडप्याला 2000 मध्ये आलिया ही मुलगी झाली. तिचा जन्म ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे झाला होता. पाच वर्षांनी, धाकट्या रियाच्या आगमनामुळे आयेशा आणि तिचा ऑस्ट्रेलियन पती 2005 मध्ये दुसऱ्यांदा पालक झाले.
शिखरने आयेशाला कधी पाहिलं?
शिखर त्याच्या फेसबुक फीडवरुन स्क्रोल करत होता, इतक्यात त्याची नजर आयेशाच्या फोटोवर खिळली. तिच्या लूकमुळे तो अक्षरशः बोल्ड झाला. क्रिकेटर हरभजन सिंग हा फेसबुकवर शिखर आणि आयेशा यांचा म्युच्युअल फ्रेण्ड होता. शिखरनेच आयेशाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती, जी तिने स्वीकारली होती. दीर्घकाळ फेसबुकवरील संभाषणामुळे दोघांची मैत्री झाली. आणि मैत्री ही प्रेमाची पहिली पायरी ठरली.
हरभजन सिंह म्युच्युअल फ्रेण्ड
शिखरने आयेशाबद्दलच्या आपल्या भावना हरभजन सिंगला सांगितल्या होत्या. हरभजनने त्याला आयेशाच्या वैवाहिक स्टेटसबद्दल सांगितले होते, परंतु जेव्हा तुम्ही प्रेमात असता, तेव्हा इतर काहीही महत्त्वाचं नसतं. विवाहित असल्याचं माहित असूनही शिखर या बंगाली ब्युटीवरील आपले प्रेम रोखू शकला नव्हता. आयेशा 10 वर्षांनी मोठी आहे, यावरही शिखरला आक्षेप नव्हता.
वडिलांचा कट्टर विरोध
शिखर धवनचे कुटुंब त्यांच्या निर्णयावर फारसे आनंदी नव्हते. आयेशासोबतच्या लग्नासाठी आई -वडिलांना राजी करणे हे शिखरसाठी अवघड काम होते. शिखर धवनचे वडील महेंद्र पाल धवन त्यांच्या विवाहाच्या सक्त विरोधात होते, पण त्याची आई सुनैना धवन त्यांच्या विवाहाबाबत सकारात्मक होत्या.
ऑक्टोबर 2012 मध्ये लग्न
बऱ्याच काळाच्या मनधरणीनंतर, शिखर आणि आयेशा यांनी 2009 मध्ये साखरपुडा केला, परंतु शिखरने लगीनगाठ बांधण्यापूर्वी थोडा वेळ थांबण्याचा आग्रह धरला. त्याला आधी स्वतःला भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी क्रिकेटपटू म्हणून प्रस्थापित करायचे होते. त्याचप्रमाणे आयेशाच्या मुली आलिया आणि रियासोबतही वेळ घालवायचा होता. अखेरीस, सर्व अडचणींवर मात केल्यानंतर, शिखर आणि आयेशा यांनी 30 ऑक्टोबर 2012 रोजी लग्न केले.
मोठी मुलगी शिखरपेक्षा फक्त 15 वर्षांनी लहान
2014 मध्ये, शिखर आणि आयेशा यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले होते. आयेशा धवनने 26 डिसेंबर 2014 रोजी मुलगा झोरावर धवनला जन्म दिला. आयेशाची मोठी मुलगी आलिया ही शिखरपेक्षा फक्त 15 वर्षांनी लहान आहे. शिखर धवनचे वय 35 आहे आणि त्याची मोठी मुलगी आलिया धवनचे वय 20 वर्ष आहे. तर धाकटी रिया 15 वर्षांची आहे, तर झोरावर धवनचे वय 6 आहे.
संबंधित बातम्या :
गब्बरच्या आयुष्यात वादळ, धवनचा पत्नी आयेशा मुखर्जीसोबत घटस्फोट, कारणांची जोरदार चर्चा