Ramesh Powar: रमेश पोवार यांना हेड कोच पदावरुन हटवलं, महाराष्ट्राच्याच दुसऱ्या खेळाडूकडे दिली मोठी जबाबदारी
टीम इंडियामध्ये मोठा बदल.....
मुंबई: भारतीय महिला क्रिकेट टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल झालाय. हेड कोच रमेश पोवार यांना हटवण्यात आलय. त्यांच्याजागी माजी क्रिकेटर ऋषिकेश कानिटकर यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऋषिकेश कानिटकर हे आता भारतीय महिला क्रिकेट टीमचे फलंदाजी प्रशिक्षक असतील. 9 डिसेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीज सुरु होतेय. त्याआधी ते टीम इंडियामध्ये दाखल होतील. 9 डिसेंबरपासून मुंबईत ही सीरीज सुरु होतेय. वर्ल्ड कप, कॉमनवेल्थ गेम्समध्ये टीमचे हेड कोच असलेले रमेश पोवार यांना नॅशनल क्रिकेट एकडमीमध्ये पाठवलय.
नव्या जबाबदारीवर रमेश पोवार म्हणाले….
रमेश पोवार आता एनसीए प्रमुख व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्या टीममध्ये काम करतील. भारतीय पुरुष क्रिकेट टीमच्या सुधारणेसाठी ते लक्ष्मण यांना साथ देतील. नव्या जबाबदारीमुळे मी खूश आहे, असं रमेश पोवार यांनी सांगितलं. महिला क्रिकेट टीमसोबतचा अनुभव खूपच चांगला होता, असं त्यांनी सांगितलं. “मी काही वर्ष दिग्गज खेळूाडूंसोबत काम केलय. एनसीएमध्ये मिळालेल्या नव्या जबाबदारीवर खूश आहे. माझा अनुभव खेळाडूंच्या उपयोगाला येईल, अशी अपेक्षा आहे. टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ मजबूत करण्यासाठी लक्ष्मण यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्साहित आहे” असं रमेश पोवार म्हणाले.
ऋषिकेश कानिटकर कोण आहेत?
ऋषिकेश कानिटकर टीम इंडियासाठी 2 टेस्ट आणि 34 वनडे सामने खेळले आहेत. त्याशिवाय 146 फर्स्ट क्लास सामन्यांचा अनुभव त्यांच्याकडे आहे. डावखुरी फलंदाजी करणाऱ्या कानिटकरांच आंतरराष्ट्रीय करिअर फारस प्रभावी नाहीय. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी आपली छाप उमटवली. कानिटकरांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 10,400 धावा केल्यात. त्याशिवाय 33 शतकं सुद्धा झळकावली आहेत.