Sourav Ganguly: ‘मी आता काहीतरी वेगळं करायला चाललोय, माझ्या…’, सौरव गांगुलीने थोडं स्पष्टच सांगितलं
बीसीसीआयमध्ये जे घडलं, ते मागे सोडणार?
मुंबई: बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदी रॉजर बिन्नी (Roger Binny) यांची निवड निश्चित मानली जात आहे. सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांची अध्यक्षपदी फेरनिवड होणार नसल्याचं स्पष्ट झालय. दुसऱ्या टर्मसाठी सौरव गांगुली यांना बीसीसीआयमध्ये कोणीही साथ दिली नाही. सौरव गांगुली आता काय करणार? असा प्रश्न त्यांच्या हितचिंतकांना पडला आहे. त्यावर सौरव गांगुली यांनी प्रतिक्रिया दिलीय.
जे घडलं ते मागे सोडणार
“मी आता काहीतरी वेगळं करणार आहे. माझ्या क्रिकेट करीयरची 15 वर्ष खूप सुंदर होती. मी कॅबचा अध्यक्ष झालो. त्यानंतर बीसीसीआयचा अध्यक्ष झालो. आता मी अजून काहीतरी वेगळं करणार आहे” असं सौरव गांगुली म्हणाले. बीसीसीआयमध्ये जे घडलं, ते मागे सोडून सौरव गांगुलीने पुढे जाण्याचे संकेत दिले आहेत.
मी बऱ्याच काळापासून प्रशासक होतो
“मी बऱ्याच काळापासून प्रशासक होतो. आता मला काहीतरी वेगळं करायचं आहे. तुम्ही आयुष्यात जे काही करता, ते चांगले दिवस असतात. मी बीसीसीआयच अध्यक्षपद भूषवलं आहे. यापुढे सुद्धा मी मोठ्या गोष्टी करत राहीन” बंधन बँकच्या कार्यक्रमात गांगुली बोलत होता.
मी इतिहासावर विश्वास ठेवत नाही
“मी इतिहासावर विश्वास ठेवत नाही. तुम्ही एका दिवसात अंबानी किंवा नरेंद्र मोदी बनत नाही. तुम्हाला तिथे पोहोचण्यासाठी अनेक महिने, वर्षानुवर्ष काम करावं लागतं” असं गांगुली म्हणाला. रॉजर बिन्नी बीसीसीआयचे पुढचे अध्यक्ष बनणार असून जय शाह सचिवपदी कायम राहतील.