RCB: IPL फ्रेंचायजींनी फसवल्याची भावना झाली होती, Harshal patel ने सांगितला धक्कादायक अनुभव
RCB Harshal patel: ते माझ्याशी खोटं बोलले असं मला वाटलं" हर्षलने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन शो मध्ये हा अनुभव कथन केला. 'या घटनेमुळे माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते'
मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) प्रमुख खेळाडू हर्षल पटेलने (Harshal patel) करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये आलेल्या धक्कादायक अनुभवाबद्दल सांगितलं आहे. आयपीएलमध्ये (IPL) करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये काही फ्रेंचायजींकडून फसवणूक झाल्याची माझी भावना झाली होती, असं हर्षल पटेल म्हणाला. फ्रेंचायजींनी ऑक्शनमध्ये माझ्यावर बोली लावली नाही, त्यावेळी माझ्या क्रिकेट करीयरबद्दल मनात काही प्रश्न निर्माण झाले होते, असं हर्षलने सांगितलं. “वेगवेगळ्या तीन ते चार फ्रेंचायजींच्या लोकांनी माझ्याशी संपर्क साधला होता. माझ्यासाठी बोली लावणार असं त्यांनी सांगितलं होतं. पण ऑक्शनच्यावेळी त्यांनी त्यांचा शब्द फिरवला. माझ्यासाठी त्यांनी बोली लावली नाही” पदार्पणाआधीचा हर्षलने त्याचा हा अनुभव सांगितला.
पण कोणीच बोली लावली नाही
“तीन ते चार वेगवेगळ्या फ्रेंचायजींच्या लोकांनी माझ्यासाठी ते बोली लावतील, असं त्यांनी मला सांगितलं होतं. पण कोणीच बोली लावली नाही. त्यावेळी त्यांनी फसवणूक केल्याची माझी भावना झाली होती. ते माझ्याशी खोटं बोलले असं मला वाटलं” हर्षलने ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन शो मध्ये हा अनुभव कथन केला. “या घटनेमुळे माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. यातून बाहेर येऊन परिस्थितीचा स्वीकार करण्यासाठी मला वेळ लागला” असं हर्षलने सांगितलं.
असे विचार मनात यायचे
“त्यावेळी मनात विचारांच काहूर माजलं होतं. कोण आहेस तू?, तू या खेळाला बरच काही दिलस, तू इतकी मेहनत केलीस, तू एवढं सर्व केलस पण तूला त्यातून काही मिळालं नाही असे विचार मनात यायचे” असं हर्षलने सांगितलं. कुटुंब अमेरिकेला स्थायिक झालं ते स्वत:चा संघर्ष, तसंच डेथ ओव्हर्समधला सर्वोत्तम गोलंदाज बनण्यासाठी घेतलेली मेहनत यावर हर्षल व्यक्त झाला आहे. हर्षल पटेल मागच्या सीजनमधला पर्पल कॅप होल्डर आहे. या सीजनमध्ये सात सामन्यात त्याने 7.42 च्या इकॉनमीने 9 विकेट घेतल्यात.