ODI World Cup 2023 | ऑगस्टमध्ये ‘या’ तारखेपासून वर्ल्ड कपसाठी सुरु होऊ शकते ऑनलाइन तिकीट विक्री
ODI World Cup 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 साठी ऑनलाइन तिकीट विक्री लवकरच सुरु होऊ शकते. वर्ल्ड कपच्या शेड्युलमध्ये सुद्धा काही बदल होऊ शकतात.
मुंबई : ICC वनडे वर्ल्ड कप 2023 चे सामने आयोजित करणाऱ्या क्रिकेट संघटनांसोबत तिकिटांच्या किंमती संदर्भात BCCI ने चर्चा केली आहे. वर्ल्ड कपच्या शेड्युलमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. काही सामन्यांच्या तारखा बदलू शकतात. हा विषय तीन-चार दिवसात निकाली काढू, असं जय शाह यांनी आश्वासन दिलं आहे. ICC चे पूर्णवेळ सदस्य असलेल्या तीन देशांनी शेड्युलमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे.
ऑनलाइन तिकीटं विकत घेणाऱ्यांकडे तिकिटाची कागदी प्रत असली पाहिजे. स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर तिकीट तपासलं जाईल. ऑनलाइन तिकिट उपलब्ध असलं, तरी इलेक्ट्रॉनिक तिकीट प्रतिष्ठेच्या 50 ओव्हर्सच्या टुर्नामेंटमध्ये स्वीकारल जाणार नाही, असं जय शाह यांनी सांगितलं. पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कप भारतात होणार आहे.
शेड्युलमध्ये नेमकं काय बदल होणार?
“शेड्युलमध्ये बदलासाठी तीन सदस्यांनी आयसीसीला विनंती केली आहे. तारखा आणि वेळ बदलण्याचा आम्ही प्रयत्न करु. सामन्याच ठिकाण बदलणार नाही. सामन्यांमधील अंतर 6 दिवसावरुन 4 ते 5 दिवसांवर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आयसीसीच्या संमतीने बदल झाल्यानंतर नेमकं चित्र स्पष्ट होईल” असं शाह म्हणाले.
भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार का?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार का? या प्रश्नावर जय शाह यांनी सांगितलं की, “सदस्य असलेल्या बोर्डांनी आय़सीसीकडे विनंती केली आहे. या संदर्भात लवकरच निर्णय होईल” वर्ल्ड कपसाठी ऑनलाइन तिकीट विक्री कधीपासून?
वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत 10 शहरात एकूण 48 सामने होणार आहेत. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत वनडे वर्ल्ड कप होईल. येत्या 10 ऑगस्टपासून वनडे वर्ल्डकपसाठी ऑनलाइन तिकीट विक्री सुरु करण्याचा बीसीसीआयचा इरादा आहे.