T20 World Cup 2022: IND vs PAK मॅचमध्ये कोण बाजी मारणार? सचिन तेंडुलकरची भविष्यवाणी
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विजेता कोण असेल? त्याची भविष्यवाणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मॅचच्या 5 दिवस आधीच केलीय
मुंबई: क्रिकेट जगताला भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याची प्रतिक्षा आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) येत्या रविवारी हे दोन्ही संघ आमने-सामने येतील. ऐतिहासिक मेलबर्नच्या (Melbourne) मैदानात हा सामना होणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यात क्रिकेटचा एक वेगळा रोमांच अनुभवता येतो. दोन्ही बाजूच्या क्रिकेट चाहत्यांना पराभव मान्य नसतो.
दोन्ही टीम्सवरही एक वेगळा दबाव असतो. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला. यावेळी टीम इंडियाने त्या पराभवाची सव्याज परतफेड करावी, अशी तमाम भारतीय क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे.
सचिनची भविष्यवाणी काय सांगते?
या बहुचर्चित भारत-पाकिस्तान मॅचआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक मोठं भाकीत वर्तवल आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टुर्नामेंटमधील आपल्या सलामीच्या सामन्यात बाबर आझमच्या टीमवर विजय मिळवेल, अशी भविष्यवाणी सचिनने केली. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये कुठल्या चार टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचतील? त्या बद्दलही सचिनने अंदाज वर्तवलाय.
टीम इंडियाबद्दल सचिन काय म्हणाला?
“टीम इंडिया फेव्हरेट आहे. माझं ह्दय भारतासोबत आहे. भारतानेच नेहमी जिंकावं अशीच माझी इच्छा असेल. मी फक्त भारतीय आहे, म्हणून हे म्हणत नाहीय. ऑस्ट्रेलियन कंडीशन्समध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याची आपली क्षमता आहे” असं सचिन म्हणाला.
सचिनच्या मते या चार टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचतील
भारताने टी 20 वर्ल्ड कप जिंकावा, अशीच माझी नेहमी इच्छा असेल. पण भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या चार टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचतील, असा सचिनचा अंदाज आहे. भारताला चांगली संधी आहे. टीम चांगली संतुलित आहे. भारत वर्ल्ड कपच जेतेपद मिळवेल, अशी मला अपेक्षा आहे, असं सचिन म्हणाला.