पार्ल: दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन कसोटी सामन्यांची (South Africa Test series) मालिका 2-1 अशी गमावल्यानंतरही विराट कोहली (Virat kohli) आणि जसप्रीत बुमराह यांच्या ICC टेस्ट रँकिंगमध्ये सुधारणा झाली आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने सेंच्युरियनची पहिली कसोटी जिंकली. पण त्यानंतर जोहान्सबर्ग आणि केपटाऊन कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला. आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली 7 व्या स्थानावर पोहोचला आहे. त्याच्या क्रमवारीत दोन स्थानांची सुधारणा झाली आहे.
म्हणून सुधारली रँकिंग
नुकत्याच झालेल्या केपटाऊन कसोटीत विराटने पहिल्या डावात 79 आणि दुसऱ्याडावात 29 धावा केल्या होत्या. त्याचा विराटला फायदा झाला आहे. कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराटने कसोटी कॅप्टनशिपचा राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिलीय. रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकला. पण तरीही तो त्याचे पाचवे स्थान कायम टिकवून आहे. विराट आणि रोहित हे दोनच भारतीय फलंदाज ICC टेस्ट फलंदाजांच्या रँकिंगमध्ये टॉप 10 मध्ये आहेत. मार्नस लाबुशेन पहिल्या स्थानावर कायम आहे. त्याखालोखाल जो रुट, स्टीव्ह स्मिथ आणि केन विलयमसनचा नंबर लागतो.
दुसऱ्याबाजूला गोलंदाजांच्या आयसीसी रँकिंगमध्ये जसप्रीत बुमराह टॉप 10 मध्ये पोहोचला आहे. त्याच्या क्रमवारीत तीन स्थानांची सुधारणा झाली. जोहान्सबर्गच्या दुसऱ्या कसोटीत तो भारताचा उपकर्णधार होता. या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बुमराहने एकूण 12 विकेट घेतल्या. भारताकडून मोहम्मद शमीने या मालिकेत सर्वाधिक विकेट घेतल्या.