अँटिंग्वा: ICC अंडर 19 वर्ल्डकप (ICC U 19 world cup) स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या टीमचा निभाव लागला नाही. राज अंगद बावा (Raj bawa) आणि रवी कुमारच्या (Ravi kumar) भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने इंग्लंडला अवघ्या 189 धावांवर रोखलं. अँटिंगामध्ये सुरु असलेल्या या सामन्यात इंग्लंडची टॉप आणि मीडल ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. जेम्स रियूने 95 धावांची शानदार खेळी केली. 34 धावांवर नाबाद असलेल्या जेम्स सेल्सने त्याला चांगली साथ दिली. दोघांनी आठव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळेच इंग्लंडचा संघ 189 धावसंख्येपर्यंत पोहोचला. अन्यथा इंग्लंडचा डाव खूप आधीच आटोपला असता. रियू बाद झाल्यानंतर पाच धावांमध्ये दोन विकेट गेल्या व इंग्लंडचा डाव आटोपला. रवी कुमारने चार तर राज बावाने पाच विकेट घेतल्या.
रवी कुमारने दिले झटके
भारताने सुरुवातीलाच इंग्लंडला दोन धक्के दिले. इंग्लंडला अवघ्या चार धावांवर पहिला झटका बसला. डावखुरा वेगवान गोलंदाज रवी कुमारने सलामीवीर जेकब बेथेलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याला अवघ्या दोन धावांवर पायचीत पकडलं. त्यानंतर रवी कुमारने इंग्लंडला दुसरा धक्का दिला. कॅप्टन टॉम प्रेस्टला भोपळाही फोडू न देता रवी कुमारने तंबूत धाडलं. त्याला क्लीन बोल्ड केलं.
राज बावाने वाट लावली
राज बावाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन इंग्लंडची वाट लावून टाकली. त्याने इंग्लंडच्या वरच्या फळीतील चार फलंदाजांना तंबुची वाट दाखवली. दमदार फलंदाजी करणारा जॉर्ज थॉमस, विलियम लिक्सटन, जॉर्ज बेल आणि रेहान अहमदची विकेट त्याने काढली.
5⃣-wicket haul in the #U19CWC Final! ? ?
What a fantastic performance this has been from Raj Bawa! ? ? #BoysInBlue #INDvENG
England U19 all out for 189.
Scorecard ▶️ https://t.co/p6jf1AXpsy pic.twitter.com/oBNj8j2d1W
— BCCI (@BCCI) February 5, 2022
रवी कुमारने फोडली जोडी
जेम्स रियू आणि जेम्स सेल्सची जोडी रवी कुमारने फोडली. रियू 95 धावांवर बाद झाला. रवीच्या गोलंदाजीवर मिड विकेटला उभ्या असलेल्या कौशल तांबेकडे झेल गेला, तो झेल तांबेच्या हातातून सुटला होता. पण त्याने पुन्हा झेप घेऊन जबरदस्त झेल घेतला. जेम्य रियू बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर रवी कुमारने थॉमस एसपिनवॉल शुन्यावर बाद केलं. त्यानंतर जोशुआ बॉयडन आऊट करुन राज बावाने व्यक्तीगत पाचवी विकेट घेतली.