IPL 2021 Final: विक्रमी सामना खेळण्याच्या तयारीत धोनी, कोणता रेकॉर्ड आता नावावर करणार?
आयपीएलच्या 14 व्या पर्वाचा अंतिम सामना काही वेळातच सुरु होणार असून हा सामना केकेआर आणि सीएसके दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. पण सीएसकेचा कर्णधार धोनीसाठी मात्र हा सामना अधिक खास आहे. कारण या सामन्यात तो एक अनोखा आणि मोठा विक्रम स्वत:च्या नावे करणार आहे.
दुबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन वर्षाहून अधिक काळ लोटला. आता तो केवळ आयपीएल (IPL) या स्पर्धेतच खेळतो. पण असे असले तरी त्याचा खेळ आणि फॅन फॉलोविंगमध्ये तिळमात्रही कमी आलेली नाही. आजही यंदाच्या आयपीएलमधील फायनलच्या सामन्यात धोनी मैदानावर उतरताच एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे करणार आहे. आज होणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्द केकेआर (KKR) सामन्यात धोनीने तब्बल 9 व्या वेळा संघाला फायनलमध्ये पोहोचवलं असून कर्णधार म्हणून एका मोठ्या रेकॉर्डला आज तो गवासणी घालणार आहे.
धोनी कर्णधार म्हणून आज त्याचा 300 वा टी20 सामना खेळणार आहे. याआधी भारतीय संघासह आयपीएलमध्ये काही काळ पुणे सुपरजायंट्ससाठी टी20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलेल्या धोनीने चेन्नई संघासाठी सर्वाधिक सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत. 2008 आयपीएलपासून संघाचा कर्णधार असणाऱ्या धोनीने आतापर्यंत 299 सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत. ज्यामध्ये 59.79 टक्के संघाचा विजयच झाला आहे.
सर्वाधिक सामने सीएसकेचा कर्णधार म्हणूनच
धोनीने 2017 साली भारतीय टी20 संघाच कर्णधारपद सोडलं. 2007 मधील टी20 वर्ल्ड कपपासून 2017 पर्यंत त्याने 72 सामन्यात संघाचं कर्णधारपद भूषवलं. ज्यामध्ये 41 विजय तर 28 पराभव झाले. तर एक सामना अनिर्णीत आणि दोन सामन्यांमध्ये काहीच रिझल्ट निघाला नाही. त्यासोबतच चेन्नई सुपर किंग्ससाठी त्याने 213 सामन्यात कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडली असून 130 सामने जिंकले आहेत. तर 81 सामने पराभूत झाला आहे. याशिवाय पुण्याच्या संघासाठी 14 सामन्यात तो कर्णधार राहिला ज्याकत पाचमध्ये विजय तर नऊ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.
धोनीच्या आसपासही कोणी नाही
धोनी शिवाय या बाबतीत दुसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी हा आहे. त्याने 200 च्या जवळपास सामन्यात टी20 संघाचा कर्णधार म्हणून काम पाहिलं आहे. वेस्टइंडीजला दोनदा टी20 वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा सॅमी 208 टी20 सामने कर्णधार म्हणून खेळला आहे. तो आता निवृत्त झाला असून जवळपास 100 सामन्यांनी धोनीच्या मागेच आहे. याशिवाय कोणताच खेळाडू धोनीच्या आसपासही नाही.
हे ही वाचा
KKR vs CSK IPL Final: चेन्नई सुपरकिंग्सच्या मनात केकेआरच्या ‘त्रिकुटा’ची भिती, धोनीच्या चिंतेतही वाढ
(In todays IPL Final in CSK vs KKR MS Dhoni to become First captain to lead in 300 t20 matches)