विराट कोहली आज मौन सोडणार, वादग्रस्त प्रश्नांवर काय उत्तर देणार?
भारतीय क्रिकेट संघाबद्दल (Team India) निर्माण झालेल्या अनेक कठिण प्रश्नांची उत्तरं त्याला द्यावी लागणार आहेत. अन्य पत्रकार परिषदांमध्ये संघ निवड, कामगिरी या बद्दल प्रश्न विचारले जातात. पण यावेळी विराटला अनेक वादग्रस्त प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.
मुंबई: वनडे कॅप्टन रोहित शर्मा (Rohit sharma) पाठोपाठ कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली वनडे सीरीज मधून ब्रेक घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा (South Africa tour) सुरु होण्याआधीच उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. रोहित आणि विराट मध्ये शीतयुद्ध सुरु असल्याची मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. दरम्यान सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांच्या पार्श्वभूमीवर टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat kohli) आज मौन सोडणार आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहली आज व्हर्च्युअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मीडियाशी संवाद साधणार आहे. त्यावेळी भारतीय क्रिकेट संघाबद्दल (Team India) निर्माण झालेल्या अनेक कठिण प्रश्नांची उत्तरं त्याला द्यावी लागणार आहेत.
मुंबईत सराव करताना रोहित शर्माला दुखापत झाली. त्यामुळे त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली आहे. त्याच्याजागी स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या प्रियांक पांचाळची संघात निवड झाली आहे. विराटची मुलगी वामिका येत्या 11 जानेवारीला एक वर्षाची होणार आहे. तिचा पहिला वाढदिवस आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी विराटने बीसीसीआयकडे ब्रेक मागितला आहे.
विराट कोहली नाराज? विराट आणि रोहित हे दोघेही भारताचे भरवशाचे खेळाडू आहेत. एक कसोटीत तर दुसरा वनडे सीरीजमध्ये खेळणार नसल्याने क्रिकेटप्रेमींच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. बीसीसीआयने कोहलीला वनडे आणि टी-२० च्या कर्णधारपदावरुन हटवून त्याच्याजागी रोहितची निवड केली आहे. त्यामुळे विराट कोहली नाराज असल्याची चर्चा आहे. याआधी सुद्धा रोहित आणि विराटमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या आल्या होत्या.
म्हणून मतभेदांच्या चर्चांना बळकटी मिळते भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननेही विराट कोहलीच्या ब्रेक घेण्याच्या वेळेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध नसल्याचं विराट कोहलीने कळवलं आहे. रोहित शर्मा सुद्धा कसोटीमध्ये खेळणार नाहीय. ब्रेक घेण्यात काहीच चुकीचं नाही. पण वेळ योग्य असली पाहिजे. या अशा घडामोडी मतभेदांच्या चर्चांना अधिक बळकटी देणाऱ्या आहेत” असं मोहम्मद अझरुद्दीनने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे. परंपरेनुसार कुठल्याही दौऱ्याआधी संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार मीडियाशी संवाद साधतात. आज राहुल द्रविड आणि कोहली पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जातील. अन्य पत्रकार परिषदांमध्ये संघ निवड, कामगिरी या बद्दल प्रश्न विचारले जातात. पण यावेळी विराटला अनेक वादग्रस्त प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.
संबंधित बातम्या:
INDvSA: रोहित दुखापतग्रस्त असल्याने सलामीच्या जागेसाठी ‘या’ तिघांमध्ये चुरस ‘आव्हानांचा विचार केला, तर…’, टेस्ट टीममध्ये निवड झाल्यानंतर प्रियांक म्हणाला… Sachin tendulkar : मास्टर ब्लास्टरची नवी ‘इनिंग’; कार कंपनीत कोट्यावधींची गुंतवणूक!