IND vs AUS : भारताचा गाबा कसोटी पराभव या योगामुळे टळणार! 10 तास ठरणार फायदेशीर
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रोमांचक वळणावर आला आहे. भारताने चौथ्या दिवशी 9 गडी गमवून 252 धावा केल्या आहेत. अजूनही ऑस्ट्रेलियाकडे 193 धावांची आघाडी आहे. असं असताना पाचव्या दिवशी काय होणार याकडे लक्ष लागून आहे. पण दहा तासांचा एक योग भारताच्या पथ्यावर पडणार आहे.

गाबा कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत होती. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 445 धावांची खेळी केली होती. त्यामुळे या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची वाताहत होईल असं वाटत होतं. खरं तर तसंच काहीसं झालं होतं. पण पावसाच्या व्यत्ययामुळे भारताला पाचव्या दिवसापर्यंत खेळ नेण्याची संधी मिळाली. त्यात केएल राहुल आणि रवींद्र जडेजाची अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली. त्यात तळाशी आलेल्या आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह यांनी फॉलोऑनचं संकट टाळलं. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीपने 39 धावांची भागीदारी केली. आता पाचव्या दिवशी काय स्थिती असेल याची चर्चा क्रीडाप्रेमींमध्ये रंगली आहे. हा सामना ड्रॉ होणार की ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकणार अशी चर्चा सुरु आहे. पण 10 तासांचा एक योग भारताच्या फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे भारताचा पराभव टळू शकतो. हा योग म्हणजे दुसरं तिसरं काय नसून वरूणराजा आहे. या सामन्यात पावसामुळे वारंवार खंड पडला आहे. चौथ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली होती. त्यात खराब प्रकाशमानामुळे सामना लवकर थांबवण्यात आला.
ब्रिस्बेनमध्ये बुधवारी अर्थात सामन्याच्या पाचव्या दिवशी पावसाची दाट शक्यत आहे. हवामान खात्याच्या वेबसाईटवरील रिपोर्टनुसार, ब्रिस्बेनमध्ये बुधवारी 10 तास पाऊस पडण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार मंगळवारी रात्री पावसाची कोणतीही शक्यता नाही. पण बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून जोरदार पाऊस पडेल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे, सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाऊस पडेल असा अंदाज आहे. म्हणजे सलग 10 तास पाऊस असेल. जर हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर भारताचा पराभव टळेल.
दुसरीकडे, बुधवारी पाऊस झाला नाही तर सामन्याचा निकाल येऊ शकतो. भारताच्या हातात एक विकेट असून ही विकेट झटपट बाद करण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल. तसेच 300 पेक्षा अधिक धावा वेगाने करण्याचा मानस असेल. ही धावसंख्या भारताला गाठणं आव्हानात्मक असेल. दरम्यान, भारताने या मैदानावर 328 धावांचं लक्ष्य गाठलं होतं. त्यामुळे या सामन्याचा निकाल काय लागतो याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.