IND vs AUS 1st ODI: स्टीव्ह स्मिथच्या स्वप्नातही येतो हा भारतीय गोलंदाज, आकडे सांगतायंत सर्वकाही
पहिल्या वनडे सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवले आहे.
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकत भारतीय संघाने आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 188 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात 300 हून अधिक धावा सहज करेल असे वाटत होते, पण त्यानंतर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीच्या भेदक माऱ्यापुढे भारताने जबरदस्त कमबॅक केले. हार्दिकने ( Hardik pandya ) या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला (steve smith) माघारी पाठवलं. त्याची विकेट घेताच हार्दिक पंड्या एका खास क्लबमध्ये सामील झाला.
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जातो. पण वनडे सामन्यांमध्ये त्याला भारतीय गोलंदाज हार्दिक पांड्याची भीती वाटत असावी. वनडेमध्ये सर्वाधिक वेळा स्टीव्ह स्मिथला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवण्यात हार्दिक पंड्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व स्टीव्ह स्मिथ करत आहे. पण वनडेत सर्वाधिक वेळा इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीदने त्याला बाद केले आहे. आदिलने स्मिथला 6 वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे. यानंतर या यादीत हार्दिक पांड्या आहे. हार्दिकने हा पराक्रम 4 वेळा केला आहे. दुसरीकडे ट्रेंट बोल्ट, स्टुअर्ट ब्रॉड, मोहम्मद शमी, मार्क वुड, उमेश यादव यांनी स्मिथला वनडेत तीन वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि ट्रॅव्हिस हेडच्या रूपाने संघाला 5 धावांवर पहिला धक्का बसला. यानंतर मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथने वेगवान धावा केल्या. जेव्हा हे दोन्ही फलंदाज खेळत होते, तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ सहज 300 धावांचा टप्पा गाठू पाहत होता, पण हार्दिकने येऊन मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यातील भागीदारी तोडली. स्मिथ 22 धावा करून बाद झाला.
Edged and taken!@hardikpandya7 strikes and how good was that grab behind the stumps from @klrahul ?
Steve Smith departs.
Watch his dismissal here ??#INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/yss3sj4N4z
— BCCI (@BCCI) March 17, 2023
स्मिथ बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला मिचेल मार्शच्या रूपाने तिसरा धक्का बसला. मिचेल मार्श ८८ धावा करून बाद झाला. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघाचा डाव फसला आणि संपूर्ण संघ अवघ्या 188 धावांवर बाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराज आणि शमीने प्रत्येकी तीन, पांड्याने प्रत्येकी एक आणि कुलदीपने प्रत्येकी एक बळी, तर जडेजाने दोन गडी बाद केले.