IND vs AUS : रोहितच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराह नाही, तर हा खेळाडू कॅप्टन्सी करणार?
रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील बहुतेक पहिल्या सामन्याला मुकावं लागण्याची शक्यता आहे. अशात उपकर्णधार जसप्रीत बुमराहऐवजी टीम इंडियातील हा खेळाडू कॅप्टन्सीसाठी प्रबळ दावेदार असल्याचं मोहम्मद कैफला वाटतं.
भारतीय क्रिकेट संघाला न्यूझीलंडकडून रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मायदेशात 0-3 ने व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. त्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही कसोटी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही सामने गमावल्याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील 5 पैकी 4 सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे भारताची ऑस्ट्रेलियाविरुद्ध खऱ्या अर्थाने ‘कसोटी’ लागणार आहे. या मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र या मालिकेतील सलामीच्या सामन्यात भारताचं नेतृत्व कोण करणार? हा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. कारण नियमित कर्णधार रोहित वैयक्तिक कारणामुळे पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची शक्यता आहे. अशात उपकर्णधार या नात्याने जसप्रीत बुमराह याला नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते. मात्र विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याला नेतृत्व देण्यात यावं, असं टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याला वाटतं.
कैफ काय म्हणाला?
ऋषभ पंत हा सध्याच्या संघातून कर्णधारपदासाठी सर्वात मोठा दावेदार आहे, असं कैफला वाटतं. कैफनुसार, पंत कर्णधारपदासाठी लायक आहे, कारण तो खेळतो तेव्हा टीम इंडियाला फ्रंटफूटवर ठेवतो. पंत कुठल्याही स्थानी बॅटिंगसाठी आला तरी तो मॅचविनिंग खेळी करण्याचा प्रयत्न करतो. पंतमध्ये प्रत्येक स्थितीत धावा करण्याची धमक आहे. पंतने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात धावा केल्या आहेत. पंतने भारतातील फिरकीसाठी पूरक असलेल्या खेळपट्ट्यांवरही धावा केल्या आहेत, असं कैफने म्हटलं.
मोहम्मद कैफने फक्त पंतला कॅप्टन करावं इतकंच नाही म्हटलं, तर त्याला का नेतृत्व द्यावं हे देखील सांगितलं. पंतपेक्षा बुमराह हा कर्णधारपदसाठी प्रबळ दावेदार आहे. त्यामुळेच बुमराहला या दौऱ्यासाठी उपकर्णधार करण्यात आलं आहे. बुमराहने भारताचं एका सामन्यात नेतृत्व केलं आहे. रोहितला जर पहिल्या सामन्याला मुकावं लागलं तर बुमराह नेतृत्व करु शकतो. मात्र कैफचा विचार करण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे.
“पंत जेव्हा अखेरचा कसोटी सामना खेळेल तेव्हा तो एक लिजेंड म्हणून निवृत्त होईल. पंतच्या विकेटकीपिंगमध्ये सुधारणा झाली आहे. पंत जेव्हापर्यंत मैदानात होता तोवर न्यूझीलंडही टेन्शमध्ये होती. जर तुम्ही भविष्यातील कर्णधाराच्या शोधात असाल तर पंतपेक्षा दुसरा कोणताही चांगला पर्याय नसेल”, असं कैफने नमूद केलं.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर.
राखीव खेळाडू : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.