IND vs BAN 1ST Test: टीम इंडियाला मोठी आघाडी, पण बांग्लादेशला नाही दिला फॉलोऑन
IND vs BAN 1ST Test: भारतीय कॅप्टनचा डिफेंसिव माइंडसेट दिसून आला.
ढाका: टीम इंडियाने बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड बनवलीय. आज कसोटीचा तिसरा दिवस आहे. दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच, तासाभरात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी बांग्लादेशचा डाव 150 धावात गुंडाळला. यासोबतच कसोटीमध्ये 254 धावांची आघाडी घेतली. टीम इंडिया बांग्लादेशला फॉलोऑन देईल असं वाटत होतं. पण कॅप्टन केएल राहुलने फॉलोऑन देण्याऐवजी पुन्हा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला.
बांग्लादेशने गुडघे टेकले
टीम इंडियाने पहिल्या डावात 404 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा डाव 150 धावात आटोपला. कुलदीप यादवने कमाल केली. त्याने 40 रन्समध्ये 5 विकेट घेतल्या. मोहम्मद सिराजने 20 धावात 3 विकेट घेतल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर बांग्लादेशी फलंदाजांनी गुडघे टेकले.
भारताचा डिफेंसिव माइंडसेट
भारतीय कॅप्टनचा डिफेंसिव माइंडसेट दिसून आला. फॉलोऑन न देण्यामागे डिफेंसिव माइंडसेट एक कारण असू शकतं. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली फ्लॉप ठरले होते. कॅप्टन राहुल 22, गिलने 20 आणि कोहली अवघा 1 रन्स काढून आऊट झाला होता.
पुजारा, अय्यर, अश्विनने संभाळला डाव
टीम इंडियाने एकवेळ 48 धावात 3 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजाराने डाव सावरला. त्यांनी धावसंख्या 112 पर्यंत पोहोचवली. पंत 46 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. पंत बाद झाल्यानंतर पुजारा आणि श्रेयस अय्यर दरम्यान शतकी भागीदारी झाली. पुजारा, अय्यर, अश्विन आणि कुलदीप यादवच्या फलंदाजीमुळे टीम इंडियाची धावसंख्या 400 पार पोहोचली. पुजारा आणि अय्यरची शतक झळकवण्याची संधी हुकली. पुजारा 90 आणि अय्यर 86 रन्सवर आऊट झाला.
गोलंदाजांनी बांग्लादेशला संधी दिली नाही
भारतीय गोलंदाजांनी बांग्लादेशची वाट लावली. पहिल्याच चेंडूवर सिराजने नजमुल हुसैन शांटोला बाद केलं. नजमुल बाद झाल्यानंतर बांग्लादेशचा डाव सावरलाच नाही. सिराज आणि कुलदीपने वाट लावून टाकली. बांग्लादेशकडून मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 28 धावा केल्या.