IND vs BAN 2nd Test Day 1: उमेश-अश्विनसमोर बांग्लादेशी फलंदाज ढेपाळले, दिवसअखेर अशी आहे स्थिती
IND vs BAN 2nd Test Day 1: बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरली आहे.
ढाका: बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिका विजयाच्या इराद्याने टीम इंडिया मैदानात उतरली आहे. आज दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाची टीम इंडियासाठी चांगली सुरुवात झाली. ढाकाच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियमवर हा कसोटी सामना सुरु झालाय. पहिल्यादिवशी उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. बांग्लादेशचा पहिला डाव 227 धावात आटोपला. बांग्लादेशकडून कॅप्टन मॉमीनुल हकने सर्वाधिक 84 धावा केल्या. पण त्याला अन्य फलंदाजांकडून चांगली साथ मिळाली नाही. खराब प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ सहा ओव्हरआधीच संपला. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये बिनबाद 19 धावा केल्या आहेत. शुभमन गिल 14 आणि केएल राहुल 3 रन्सवर खेळतोय.
जयदेव उनाडकटकडून चांगली सुरुवात
मागच्या सामन्यातील स्टार गोलंदाज कुलदीप यादवशिवाय टीम मैदानात उतरली होती. आज टीम इंडियाने डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला संधी दिली. जयदेव उनाडकटने 12 वर्षांपूर्वी टीम इंडियासाठी डेब्यु केला होता. त्याने टीमला आज पहिलं यश मिळवून दिलं. सौराष्ट्राच्या या अनुभवी गोलंदाजाने भागीदारी तोडण्यात आणि फलंदाजांवर दबाव टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
टेस्टमधील पहिली विकेट
बांग्लादेशने या कसोटीत टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. झाकीर हसन आणि नजमुल शांटोने 15 ओव्हरपर्यंत 39 धावांची भागीदारी केली. त्यानंतर उनाडकटने झाकीरला एका शॉर्ट चेंडूवर गलीमध्ये कॅचआऊट केलं. उनाडकटचा कसोटीमधील हा पहिला विकेट होता.
चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलला नाही
मागच्या कसोटीत टेस्ट डेब्युमध्ये शतक झळकवणारा झाकीर यावेळी क्रीजवर सेट झाला होता. पण तो मोठी इनिंग खेळू शकला नाही. बांग्लादेशच्या अन्य फलंदाजांची हीच स्थिती होती. त्यांना चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलता आला नाही.
मोमीनुलची दमदार फलंदाजी
मोमीनुल हकने 6 महिन्यानंतर बांग्लादेशी टीममध्ये पुनरागमन केलं. तो बांग्लादेशचा यशस्वी फलंदाज ठरला. या डावखुऱ्या फलंदाजाने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. मोमीनुलने 84 धावा करताना 16 वं अर्धशतक झळकावलं. कॅप्टन शाकीब अल हसनने 16, मुशफिकुर रहीमने 26 आणि लिट्टन दासने 25 धावा केल्या. पण तो मोठी भागीदारी करु शकले नाहीत.