4,4,4,4,4,4,4,4,4,4,6…! कानपूरमध्ये यशस्वी जयस्वालची आक्रमक खेळी, 10 षटकात 100 धावा
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना आता रंगतदार वळणावर आहे. दोन दिवसांचा खेळ शिल्लक असताना वादळी खेळीचं दर्शन घडत आहे. बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपल्यानंतर यशस्वी जयस्वालच्या वादळ पाहायला मिळालं.
भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल लागणार की नाही असा प्रश्न आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. त्यामुळे आता दोन दिवसात सामन्याचा निकाल लागणार की नाही? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. चौथ्या दिवशी लंचनंतर बांगलादेशचा संपूर्ण संघ 233 धावांवर तंबूत परतला. या धावांचा पाठलाग करत मोठी धावसंख्या उभारण्याचं आव्हान भारतासमोर होतं. त्यामुळे आक्रमक खेळीशिवाय पर्याय नसल्याचं जाणकारांचं म्हणणं होतं. मग काय रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने आक्रमक सुरुवात करून दिली. बांगलादेशी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. रोहित शर्माने 11 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकार मारत 23 धावा केल्या. पण हसन मिराजच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला. असं असलं तरी यशस्वी जयस्वाल नावाचं वादळ घोंगावत राहिलं. त्याने बांगलादेशी गोलंदाजांच्या चिंध्या केल्या. कसोटी आहे की टी20 तेच कळेना. पण क्रीडारसिकांचं या खेळीमुळे चांगलंच मनोरंजन झालं.
यशस्वी जयस्वालने 31 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकार मारत 50 धावा केल्या. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील आपला फॉर्म कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. इतकंच काय तर यशस्वी जयस्वालने बांगलादेशी गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली. त्यामुळे भारताच्या नावावर कसोटीत एक विक्रम रचला गेला आहे. 10.1 षटकात संघाच्या 100 धावा झाल्या आहेत. आतापर्यंतचे सर्व विक्रम भारतीय संघाने मोडीत काढले आहेत. यापूर्वीचा विक्रमही भारताच्या नावावर होता. पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 2023 मध्ये 12.2 षटकात 100 धावा केल्या होत्या.
भारताने आज 400 पार धावांचा पल्ला गाठला तर शेवटच्या दिवशी विजयाचं गणित सोपं होऊ शकतं. त्यामुळे आक्रमक खेळण्याशिवाय पर्याय नाही. मोठी धावसंख्या उभारली तर बांगलादेशला शेवटच्या दिवशी प्रतिकार करणं कठीण जाईल. भारताने हा सामना जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेतील अव्वल स्थान कायम राहील. तसेच अंतिम फेरीचं गणित आणखी सोपं होणार आहे. त्यामुळे भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात आणि शेवटच्या दिवशी काय निकाल लागतो? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.