IND vs ENG: आर.अश्विन कोविड पॉझिटिव्ह, इंग्लंड विरुद्ध कसोटीत खेळणार?
भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) येत्या 1 जुलैपासून कसोटी सामना सुरु होणार आहे. मागच्यावर्षी कोविड मुळे रद्द झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे.

मुंबई: भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) येत्या 1 जुलैपासून कसोटी सामना सुरु होणार आहे. मागच्यावर्षी कोविड मुळे रद्द झालेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. कसोटी सामन्यानंतर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी सामन्यासाठी रविचंद्रन अश्विनचा (R Ashwin) अपवाद वगळता सर्वच खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. अश्विन अजून इंग्लंडला पोहोचू शकलेला नाही. त्याचं कारण आहे कोरोना व्हायरस. रविचंद्रन अश्विनला कोरोना व्हायरसची (Corona virus) लागण झाली आहे. त्यामुळे सध्या तो क्वारंटाइन आहे. इंग्लंडसाठी पहिला ग्रुप 16 जूनलाच रवाना झाला. भारतीय संघातील खेळाडुंनी गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे आणि फलंदाजी कोच विक्रम रोठाड यांच्या मार्गदर्शनाखाली सरावही सुरु केला आहे.
बोर्डाने काय म्हटलय?
“कोरोनाची लागण झाल्यामुळे अश्विन इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकलेला नाही. तो वेळेवर बरा होईल व 1 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असेल, अशी अपेक्षा आहे” असं बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला सांगितलं. अश्विन सराव सामन्याला मुकू शकतो. कसोटी सामन्याआधी भारत लिसेस्टशायर विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला होता. अश्विन या संघाचा भाग होता. मागच्या महिन्यात अश्विन आयपीएल 2022 च्या फायनल मध्ये खेळला होता. बायो बबलमधून बाहेर पडल्यानंतर अश्विन चेन्नई टीएनसीए डिवीजन 1 च्या लीगमध्ये सहभागी झाला होता.
अश्विन महत्त्वाचा का?
अश्विनशिवाय संघातील अन्य खेळाडू यूके मध्ये पोहोचले असून ते जोरदार मेहनत करतायत. बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर टीम इंडियाच्या नेट सेशनचा व्हिडिओ पोस्ट केला होता. परदेश दौऱ्यांमध्ये अश्विन भारतीय संघाचा भरवशाचा फिरकी गोलंदाज आहे. त्याशिवाय आपल्या फलंदाजीच्या बळावरही त्याने संघाला अनेकदा अडचणीतून बाहेर काढलय. त्यामुळे एजबॅस्टन कसोटीत त्याने खेळणं महत्त्वाचं आहे. टीम इंडियाचा आणखी एक संघ 24 आणि 26 जूनला आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामने खेळणार आहे. त्या टीमचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे आहे.