IND vs ENG: Rohit sharma ची कार्डियोव्हॅस्क्युलर टेस्ट होणार, का केली जाते ही टेस्ट समजून घ्या…
IND vs ENG: भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अखेर आयसोलेशनमधून (Isolation) बाहेर आला आहे. कोविड 19 ची त्याची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
मुंबई: भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अखेर आयसोलेशनमधून (Isolation) बाहेर आला आहे. कोविड 19 ची त्याची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. कोविड मधून बरा झाल्यानंतर रविवारी त्याने पहिल्यांदा सराव सत्रात भाग घेतला होता. आता त्याला बंधनकारक असलेली कार्डियोव्हॅस्क्युलर टेस्ट (cardiovascular tests) करावी लागणार आहे. 7 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध साऊथम्पटन येथे टी 20 मालिका सुरु होत आहे. रोहित ही मालिका खेळण्यासाठी फिट आहे का? ते कार्डियोव्हॅस्क्युलर टेस्ट मधून समजणार आहे. सराव सामन्याच्या तिसऱ्यादिवशी रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तो एकमेव कसोटी सामना खेळू शकला नाही.
रिकव्हरीसाठी वेळ हवा
“रोहितच्या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार तो क्वारंटाइमधून बाहेर आला आहे. तो टी 20 सराव सामन्यात खेळला नाही. पहिल्या टी 20 आधी त्याला रिकव्हरीसाठी तसंच ट्रेनिंगसाठी वेळ गरजेचा आहे” असं बीसीसीआयमधील पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
कार्डियोव्हॅस्क्युलर टेस्ट का केली जाते?
35 वर्षांचा रोहित शर्मा रविवारी पहिल्यांदा नेट सत्रात सहभागी झाला होता. 30 मिनिटापेक्षा जास्तवेळ हे सेशन चाललं नाही. मेडिकल प्रोटोकॉलनुसार, क्वारंटाइनमधून बाहेर आलेल्या कुठल्याही खेळाडूवर कार्डियोव्हॅस्क्युलर टेस्ट केली जाते. ही टेस्ट बंधनकारक आहे. फुप्फुसांची क्षमता आणि कोविड 19 नंतर फुप्फुसाचं कार्य कसं सुरु आहे, ते या कार्डियोव्हॅस्क्युलर टेस्टमधून समजतं.
भारताकडे 15 वर्षानंतर विजयाची संधी
रोहित शर्मा उपलब्ध नसल्याने जसप्रीत बुमराहला पाचव्या कसोटीसाठी कॅप्टन बनवण्यात आलं आहे. आज कसोटीचा चौथा दिवस आहे. मागच्यावर्षी बाकी राहिलेल्या कसोटी मालिकेतील हा सामना आहे. आतापर्यंत या सीरीजमधील चार सामने झाले आहेत. भारत मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. भारताकडे 15 वर्षानंतर इंग्लंडमध्ये मालिका विजयाची संधी आहे.