Sanju Samson: संजू सॅमसनवर अन्याय, हॅमिल्टन वनडेमधून बाहेर करण्यामागे कारण काय?
Sanju Samson: उलट सूंजला संधी देऊन सूर्यकुमार यादवला बाहेर बसवता आलं असतं, कारण....
हॅमिल्टन: भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज दुसरा वनडे सामना हॅमिल्टन येथे होत आहे. पावसाच्या सावटाखाली हा सामना सुरु आहे. या मॅचमध्ये टीम मॅनेजमेंटने घेतलेल्या एका निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. संजू सॅमसनला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेलं नाही. हॅमिल्टनमध्ये टॉस झाल्यानंतर कॅप्टन शिखर धवनने टीममध्ये 2 बदलांची घोषणा केली.
संजू सॅमसनच का?
वेगळा देश, वेगळं शहर, वेगळी परिस्थती, कंडीशन्स अशावेळी टीममध्ये संतुलन साधण्यासाठी टीममध्ये परिवर्तन आवश्यक असतं. हॅमिल्टन वनडेमध्य़े संजू सॅमसनच्या जागी दीपक हुड्डाचा समावेश करण्यात आला आहे. दीपक हुड्डाबद्दल कुठलीही तक्रार नाही. पण संजू सॅमसनबरोबर जे झालं, ते सुद्धा योग्य नाही. दीपक हुड्डाचा समावेश करायचा होता, तर धावा न करणाऱ्या दुसऱ्या खेळाडूंना बाहेर बसवता आलं असतं.
पंतला का ड्रॉप केलं नाही?
संजू सॅमसनला पहिल्या ऑकलंड वनडेमध्ये संधी मिळाली होती. त्याने 38 चेंडूत 36 धावा केल्या होत्या. तो फॉर्ममध्ये आहे हे दिसत होतं. दुसऱ्या वनडेत संधी दिल्यास, त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला असता. पण असं झालं नाही. टीममधून सॅमसनला वगळण्यात आलं. मॅनेजमेंटकडे ऋषभ पंतला ड्रॉप करण्याचा पर्याय होता.
पहिल्या वनडेत पंतने किती धावा केल्या?
ऑकलंडमधील पहिल्या वनडेत ऋषभ पंतने 23 चेंडूत 15 धावा केल्या. तो वनडे टीमचा उपकर्णधार आहे. त्यामुळे कदाचित ऋषभ पंत टीममध्ये असेल. टीम मॅनेजमेंटला कीपर बॅट्समनचा पर्याय हवा होता, तर संजू सॅमसन चांगला पर्याय होता.
सूर्यकुमारच्या जागी सुद्धा हुड्डाला घेता आलं असतं?
वनडेमध्ये सूर्यकुमार यादवपेक्षा सॅमसनची कामगिरी चांगली आहे. टी 20 मध्ये सूर्यकुमार चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण वनडेमध्ये त्याची कथा वेगळी आहे. त्याने मागच्या चार वनडे सामन्यात 13,9,8,4 अशा धावा केल्या आहेत. फक्त एकदाच दोन आकडी धावा केल्या आहेत.
संजूची मागच्या चार सामन्यातील कामगिरी पहा
संजू सॅमसनने मागच्या चार वनडेत 86*, 30*, 2*, 36 अशा धावा केल्या आहेत. 3 वेळा नाबाद आणि एक अर्धशतक त्याच्या नावावर आहे. या आकड्यांवरुन स्पष्ट होतं, कोणाला संधी दिली पाहिजे. सूर्यकुमार यादवच्या जागी दीपक हुड्डा चांगला पर्याय ठरला असता. कारण त्यामुळे सतत क्रिकेट खेळणाऱ्या सूर्यकुमार यादवला आराम मिळाला असता.