भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. आज सामन्याचा पाचवा दिवस आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेटरसिकांचे लक्ष आता पुढच्या कसोटीकडे लागले आहे. दुसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे. याद्वारे विराट कोहली संघात पुनरागमन करेल. कानपूरच्या पहिल्या कसोटीत त्याने विश्रांती घेतली होती. पण दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियासमोर प्रश्न असा आहे की, विराट कोहलीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यासाठी संघातील कोणत्या खेळाडूला बाहेर बसवलं जाणार? चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे दोन वरिष्ठ खेळाडू फॉर्मशी झगडत आहेत, अशात विराट कोहलीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या श्रेयस अय्यरने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावलं आहे. त्यामुळे विराटच्या जागेची गुंतागुंत वाढली आहे. तसेच, भारतीय संघ पाचपैकी एकाही गोलंदाजाला वगळू शकत नाही. अशा परिस्थितीत मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यापैकी एकाला बाहेर जावे लागेल.