Deepak Hooda: घाबरलास का? एका प्रसिद्ध क्रिकेटपटूचा दीपक हुड्डाला प्रश्न
दीपक हुड्डाला असं का विचारलं? काय आहे त्यामागे कारण....
मुंबई: टीम इंडियाला दीपक हुड्डाकडून भरपूर अपेक्षा आहेत. तो न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये प्लेइंग 11 चा भाग होता. न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात तो विशेष काही करु शकला नाही. पण चेंडूने त्याने कमाल केली. हुड्डाने 4 विकेट काढल्या. न्यूझीलंडच्या फलंदाजांना त्याने पूर्ण 20 ओव्हर्सही मैदानावर खेळू दिलं नाही.
न्यूझीलंड विरुद्ध टी 20 सीरीजमध्ये दीपक हुड्डा भले बॅटपेक्षा बॉलने यशस्वी ठरला असेल, पण तो स्वत:ला गोलंदाजापेक्षा फलंदाज मानतो.
मी बॅटिंग ऑलराऊंडर
“मी नेहमीच बॅटिंग ऑलराऊंडर राहिलोय. माझ्यासाठी धावा करणं जास्त महत्त्वाच आहे. मी माझ्या गोलंदाजीवरही काम करतो. म्हणजेच माझ्या टीमला गरज असताना, मी गोलंदाजी करु शकेन” असं दीपक हुड्डा म्हणाला. “मी जेव्हा डेब्यु केलाय, तेव्हापासून ऑलराऊंडरच्या भूमिकेत आहे. मागच्या 3 महिन्यात मी माझ्या गोलंदाजीवर भरपूर काम केलय” असं त्याने सांगितलं.
नंबर 3 वर अडचण काय?
दीपक हुड्डाला त्याचा बॅटिंग पोजिशनबद्दल प्रश्न विचारण्यात आला, त्यावर तो म्हणाला की, “मला नंबर 5 वर बॅटिंग करायला आवडेल. नंबर तीनचा प्रश्नच येत नाही. कारण त्या जागेवर मोठे प्लेयर खेळतात. 5 व्या आणि 6 व्या नंबरवर फलंदाजी करताना परिस्थितीनुसार, खेळण्यासाठी थोडा वेळ लागतो. पण मला माझी भूमिका माहितीय. आता मी स्थितीनुसार, तसा खेळण्याचा प्रयत्न करतो”
हुड्डा घाबरला वाटतं
तिसऱ्या स्थानावर बॅटिंग करण्यासंबंधी हुड्डाच उत्तर ऐकून मोहम्मद कैफने थोडं आश्चर्य व्यक्त केलं. वाटतं हुड्डा घाबरला? असं कैफ म्हणाला. “मला टॉप ऑर्डरमध्ये खेळायचय. मला भारतासाठी चांगली कामगिरी करायचीय. मला केएल राहुलच्या स्थानावर खेळायचय. मी विराट कोहलीची जागा घेईन. कुठलीही भिती न बाळगता त्याने असं बोलायला पाहिजे होतं. त्याच्याकडे अशा प्रकारची विचारसरणी असेल, तरच तो भारतासाठी चांगली कामगिरी करु शकतो” असं मोहम्मद कैफ म्हणाले.