IND vs SA 2nd ODI: श्रेयस अय्यर, इशान किशनची जबरदस्त बॅटिंग, टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं
IND vs SA 2nd ODI: टीम इंडियाने दुसऱ्या वनडे सामन्यात मागचं अपयश धुवून काढलं
मुंबई: श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि इशान किशनने (Ishan Kishan) आज दमदार खेळ दाखवला. त्यांच्या फलंदाजीच्या बळावर टीम इंडियाने आज दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर (IND vs SA) सात विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. रांचीमध्ये श्रेयस अय्यर आणि इशान किशनने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
श्रेयस अय्यरने आज वनडे करीयरमधलं दुसर शतक झळकावलं. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 279 धावांच लक्ष्य दिलं होतं. टीम इंडियाने 3 विकेट गमावून 25 चेंडू आधीच विजय मिळवला.
श्रेयस-इशानची जबरदस्त भागीदारी
279 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने आपले दोन्ही सलामीवीर 48 धावात गमावले होते. शिखर धवन आणि शुभमन गिल लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर इशान किशन आणि श्रेयस अय्यरने डाव सावरला. दोघांनी दमदार भागीदारी केली. टीमचा स्कोर 200 च्या पुढे नेला.
श्रेयस अय्यरच नाबाद शतक
अय्यर आणि किशन दोघांनी चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. किशन पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर अय्यरला संजू सॅमसनची साथ मिळाली. दोघांनी मिळून टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अय्यरने नाबाद 113 धावांची खेळी केली. त्याने 111 चेंडूत 15 चौकार लगावले. किशनने 84 चेंडूत 93 धावा फटकावल्या. संजू सॅमसन 30 धावांवर नाबाद राहिला.
रिझा हेनड्रीक्स-एडन मार्करामने सावरला डाव
दक्षिण आफ्रिकेची सुरुवात फार चांगली झाली नव्हती. 40 धावात त्यांनी दोन्ही ओपनर गमावले होते. त्यानंतर रिझा हेनड्रीक्स आणि एडन मार्करामने दक्षिण आफ्रिकेच्या डावाला आकार दिला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 129 धावांची भागीदारी केली. रिझा 74 धावांवर बाद झाला. 76 चेंडू खेळताना त्याने 9 चौकार आणि 1 षटकार लगावला.
एडन मार्करामने 89 चेंडूत 79 धावा फटकावल्या. यात 7 चौकार आणि 1 षटकार होता. रिझा हेनड्रीक्सला मोहम्मद सिराजने अहमदकरवी कॅच आऊट केलं. मार्करामला वॉशिंग्टन सुंदरने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.