IND VS SA: निगीडी-रबाडासमोर भारतीय फलंदाजांची सपशेल शरणागती, दोघांनी मिळून काढल्या 9 विकेट
लुंगी निगीडी आणि कगिसो रबाडा या वेगवान गोलंदाजांनी भारताची योजना धुळीस मिळवली. दोघांच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.
जोहान्सबर्ग: सेंच्युरियन कसोटीच्या (Centurion test) पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतासाठी तिसरा दिवस निराशाजनक ठरला आहे. रविवारी नाबाद असलेली केएल राहुल (Kl Rahul) आणि अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) जोडी मोठी धावसंख्या उभारण्याच्या इराद्याने मैदानावर उतरली होती. पण लुंगी निगीडी आणि कगिसो रबाडा या वेगवान गोलंदाजांनी भारताची योजना धुळीस मिळवली. दोघांच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा पहिला डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. निगीडीने सहा तर राबाडाने तीन विकेट घेतल्या. भारताचा पहिला डाव 327 धावात आटोपला. रविवारच्या धावसंख्येत भारताला फक्त 54 धावांची भर घालता आली.
सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्टपार्क स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. काल दुसऱ्यादिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. आज सकाळी रहाणे आणि राहुलने डाव पुढे सुरु केला. मोठी धावसंख्या उभारण्याचे लक्ष्य ठेवून दोन्ही फलंदाज मैदानात उतरले होते. पण पाच धावांची भर घातल्यानंतर 278 धावांवर राहुलच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्याला रबाडाने विकेटकिपर क्विंटन डि कॉककरवी झेलबाद केले. राहुल 123 धावांवर बाद झाला.
त्यानंतर अजिंक्य रहाणे 48 धावांवर निगीडीच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. तंबूत परतण्याची जणू त्यांच्यात स्पर्धाच लागली होती. ऋषभ पंत (8), अश्विन (4) आणि शार्दुल ठाकूर (4) धावांवर माघारी परतले. निगीडीने सहा तर रबाडाने तीन विकेट घेतल्या.
संबंधित बातम्या:
रोहित शर्मामुळे ODI टीमचं सिलेक्शन पुढे ढकललं, 4 वर्षांनंतर दिग्गज खेळाडूचं पुनरागमन 20 षटकारांसह 253 धावा, स्फोटक फलंदाजीसह संघ विजयी, धडाकेबाज फलंदाजाची टीम इंडियात निवड होणार? Sourav Ganguly : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाचा संसर्ग, कोलकातामधील रुग्णालयात दाखल, सूत्रांची माहिती