IND vs SA: …म्हणून इशांत ऐवजी शार्दुलची निवड, ‘या’ पाच गोलंदाजांना संधी, पाहा भारताची प्लेइंग XI
विराटच्या नेतृत्वाखाली नवीन इतिहास रचण्याच्या इराद्याने टीम मैदानात उतरली आहे. संघाने पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेवर विश्वास दाखवत त्याला टीममध्ये स्थान दिले आहे.
सेंच्युरियन: भारत आणि दक्षिण आफ्रिकेनमध्ये (IND vs SA) सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क (Centurion super sports park) स्टेडियमवर पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. कर्णधार विराटने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतली आहे. धावफलकावर पहिल्या धावा लागणं, फायद्याचा सौदा ठरेल असं विराटने म्हटलं आहे. टॉसनंतर दोन्ही संघांनी आपली प्लेइंग इलेवन जाहीर केली आहे.
भारताची सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कवर कामगिरी फार चांगली नाहीय. मागच्या दोन्ही कसोटी सामन्यात भारताचा इथे पराभव झाला आहे. पण यावेळी विराटच्या नेतृत्वाखाली नवीन इतिहास रचण्याच्या इराद्याने टीम मैदानात उतरली आहे. संघाने पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेवर विश्वास दाखवत त्याला टीममध्ये स्थान दिले आहे.
या पाच गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची भारत या कसोटीत पाच गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. जसप्रीत बुमराह, आर.अश्विन, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूर यांना संधी दिली आहे. सर्वाधिक अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा बेंचवरच बसणार आहे.
इशांत ऐवजी शार्दुलला का संधी दिली? इशांत शर्माकडे अनुभव जास्त आहे. पण शार्दुल प्रसंगी उपयुक्त फलंदाजी सुद्धा करु शकतो ही जमेची बाजू आहे. यावर्षी शार्दुलने आपल्या कामगिरीने स्वत:ला सिद्ध सुद्धा केलं आहे. कसोटीत शादुर्लने तीन सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत तर 37.20 च्या सरासरीने 232 धावा केल्या आहेत. त्यामुळे इशांतऐवजी शार्दुलला पसंती मिळू शकते.
भारताची प्लेइंग XI केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर