Asia cup 2022: दोन मॅच, दोन ओव्हर, एकसारखीच स्थिती, रोहित-द्रविड जोडीसमोर नवीन टेन्शन
Asia cup 2022: टीम इंडियाने कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचा अपेक्षाभंग केला आहे. रोहित शर्माची टीम सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. टीम इंडियावर अशी वेळ येईल, याची कोणीही कल्पना केली नव्हती.
मुंबई: टीम इंडियाने कोट्यवधी क्रिकेटप्रेमींचा अपेक्षाभंग केला आहे. रोहित शर्माची टीम सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. टीम इंडियावर अशी वेळ येईल, याची कोणीही कल्पना केली नव्हती. आशिया कप स्पर्धेत विजेतेपदाचे दावेदार म्हणून त्यांनी सुरुवात केली होती. सुरुवातही दमदार होती. पण दुसऱ्याटप्प्यात टीम इंडियाला झटका बसला.
आधी पाकिस्तान नंतर श्रीलंकेकडून पराभव झाला. आता जेतेपद मिळवणं दूरच राहिलं. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी दुसऱ्याटीमवर अवलंबून रहाव लागणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून झालेल्या पराभवात दोन ओव्हर्स महत्त्वाच्या ठरल्या.
10 महिन्यानंतर सलग 2 पराभव
रविवारी टीम इंडियाने पाकिस्तानला 182 धावांच टार्गेट दिलं होतं. पाकिस्तानने ते लक्ष्य पाच विकेट राखून पार केलं. कालच्या सामन्यात श्रीलंकेला 174 धावांच लक्ष्य दिलं होतं. श्रीलंकेने ते पार केलं. 10 महिन्यानंतर पहिल्यांदा टीम इंडियाचा सलग दोन टी 20 सामन्यात पराभव झालाय. योगायोग म्हणजे मागच्यावेळी सुद्धा दुबईतच असं घडलं होतं. दोन्हीवेळा टीम इंडियाचा प्रथम फलंदाजी करताना पराभव झाला. तो टी 20 वर्ल्ड कप होता. ही आशिया कप स्पर्धा आहे.
दोन मॅच, दोन ओव्हर, तीच स्थिती
मागच्यावेळी टीम इंडियाच्या पराभवाच कारणं खराब फलंदाजी होती. यावेळी बॅटिंगपेक्षा गोलंदाजांचा जास्त दोष आहे. टीम इंडियाच्या दोन्ही पराभवाला 19 वी ओव्हर कारणीभूत ठरलीय. टी 20 क्रिकेटमध्ये 19 वी ओव्हर महत्त्वाची असते. 19 वी ओव्हर टाइट पडली, तर 20 व्या ओव्हरमध्ये फायदा मिळू शकतो. टीम इंडियाला याच ओव्हरमध्ये फटका बसला.
शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये किती धावा हव्या होत्या?
पाकिस्तान विरुद्ध 2 ओव्हर्समध्ये 26 धावांची आवश्यकता होती. त्यावेळी 19 व्या षटकात 19 धावा गेल्या. त्यामुळे शेवटच्या षटकात विजयासाठी फक्त 7 धावांची गरज होती. श्रीलंकेविरुद्ध 2 ओव्हर्समध्ये 21 धावांची गरज होती. यावेळी 19 व्या ओव्हरमध्ये 14 धावा गेल्या. पुन्हा शेवटच्या षटकात विजयासाठी 7 धावांची गरज होती.
दोन्हीवेळा भुवनेश्वरची चूक
या दोन सामन्यात एक समानता होती. ही समानताच निराशेच मुख्य कारण आहे. या दोन्ही सामन्यात 19 वी ओव्हर भुवनेश्वर कुमारने टाकली. रोहित शर्माने चेंडू त्याच्या हातात सोपवली. मागच्या काही महिन्यात भुवनेश्वरने डेथ ओव्हर्समध्ये दमदार गोलंदाजी केलीय. पण आशिया कपच्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भुवनेश्वरने 19 व्या ओव्हरमध्ये जास्त धावा दिल्या. ते सुद्धा टीम इंडियाच्या पराभवाच एक कारण आहे. या दोन्ही मॅचमध्ये 20 वी ओव्हर अर्शदीपने टाकली. त्याने प्रतिस्पर्धी संघाला चांगलच अडचणीत आणलं. विजयासाठी 7 धावा करतानाही नाकीनाऊ आले. दोन्ही सामन्यात पाकिस्तान-श्रीलंकेला विजयासाठी प्रत्येकी 7 धावांची गरज होती.