IND vs SL : भारताच्या अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची बाधा, दुसरा टी-20 सामना पुढे ढकलला
कोरोनाच्या संकटाने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघात शिरकाव केला आहे. आधी इंग्लंडला ऋषभ पंतला कोरोनाची बाधा झाल्यानंतर आता श्रीलंका दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूला कोरोनाची बाधा झाली आहे.
कोलंबो : भारतीय क्रिकेट संघात पुन्हा एकदा कोरोनाने शिरकाव केला आहे. नुकताच इंग्लंडमध्ये असणाऱ्या संघातील ऋषभ पंत कोरोनातून सावरला असताना आणखी एका आघाडीच्या भारतीय खेळाडूला कोरोनाची बाधा झाली आहे. हा भारतीय खेळाडू म्हणजे अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्या (Krunal Pandya Tested Corona Postive) असून तो सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. नुकतीच त्याने एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली. त्यानंतर रविवारी झालेल्या पहिल्या टी-20 मालिकेतही कृणाल संघामध्ये होता. सुरुवातीपासून संघात असणाऱ्या कृणालला कोरोनाची बाधा झाल्याने संपूर्ण संघावर कोरोनाचे सावट आले आहे.
या संकटामुळे भारत आणि श्रीलंका यांच्यातील आज (27 जुलै) होणारा दुसरा टी-20 सामनाही पुढे ढकलण्यात आला आहे. नुकतेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) याबद्दल माहिती देत ट्विट देखील केलं आहे. BCCI ने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी कृणाल पंड्याची रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात आली त्यात तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याला त्वरीत विलगीकरणात ठेवण्यात आले. त्याच्या जवळच्या संपर्कात आलेल्या आणखी 8 जणांनाही विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तसेच संपूर्ण संघाची आरटीपीसीआर चाचणी सध्या सुरु आहे.
NEWS : Krunal Pandya tests positive.
Second Sri Lanka-India T20I postponed to July 28.
The entire contingent is undergoing RT-PCR tests today to ascertain any further outbreak in the squad.#SLvIND
— BCCI (@BCCI) July 27, 2021
कधी होऊ शकतो दुसरा टी-20 सामना?
पहिल्या टी-20 सामन्यात भारताने श्रीलंका संघावर 38 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर आज (27 जुलै) दुसरा सामना खेळवला जाणार होता. पण भारतीय संघातून सुरुवातीपासून खेळणाऱ्या कृणालला कोरोनाची बाधा झाल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून सर्व खेळाडूंना विलगीकरणात ठेवले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जर सर्व खेळाडूंच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्या तर सामना उद्या म्हणजेच 28 जुलैला खेळवला जाऊ शकतो.
पृथ्वी आणि सूर्यकुमारच्या इंग्लंड दौऱ्यावर प्रश्नचिन्ह!
श्रीलंकेतील भारतीय संघात कोरोनाच्या शिरकावामुळे तिकडे इंग्लंडच्या संघाची डोकेदुखीही वाढली आहे. कारण श्रीलंका दौऱ्यानंतर त्वरीत इंग्लंडला रवाना होणाऱ्या पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांच्या रवानगीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भारतीय संघातील शुभमन आणि वॉशिंग्टन सुंदर यांना दुखापतीमुळे मालिकेबाहेर पडावे लागले त्याठिकाणी पृथ्वी आणि सूर्या जाणार होते. मात्र ते सोबत खेळत असलेल्या खेळाडूलाच बाधा झाल्याने त्याच्या इंग्लंडला जाण्यावरही शंका व्यक्त केली जात आहे. सध्यातरी सर्व संघासोबत त्यांची आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे.
(IND vs SL Krunal Pandya Tested Corona Positive Second T20I Postponed)