IND vs ZIM: 12व्या क्रमांकाच्या संघाकडून वर्ल्ड चॅम्पियन्स संघाचा पराभव, अनेक लाजीरवाणे रेकॉर्ड
IND vs ZIM 1st T20I: झिम्बाब्वेविरुद्धच्या 115 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठई मैदानात उतरलेल्या भारतीय संघ 102 धावांवर ऑलआऊट झाला. भारतीय संघ 5 सामन्यांच्या T20 मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गेल्या आठवड्यातच भारताने टी-२० विश्वचषक जिंकला. मात्र झिम्बाब्वेसमोर 116 धावांचे लक्ष्य असताना भारतीय संघ अवघ्या 102 धावांवर बाद झाला. हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली पण फलंदाजीला येताच भारतीय खेळाडूंची एकामागे एक विकेट पडल्या. भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. भारताच्या विकेट पडू लागल्या आणि सामना झिम्बाब्वेकडे झुकू लागला. भारतीय संघाला 20 षटकांत 116 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. भारताविरुद्धचे हे सर्वात लहान लक्ष्य आहे. यापूर्वी टीम इंडियाला 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 127 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नव्हता.
भारताचा डाव 102 धावांवर आटोपला. 2016 नंतर टीम इंडियाची टी-20 इंटरनॅशनलमधील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. एकूण संघाची सर्वात कमी धावसंख्या 74 धावा आहे, जी 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती.
मालिकेतील पहिलाच सामना भारतीय संघ हरला आहे. संघाने वर्षाची सुरुवात अफगाणिस्तानविरुद्ध 3-0 अशी मालिका जिंकून केली. त्यानंतर सलग 8 सामने जिंकून भारत टी-20 विश्वचषकाचा विजेता ठरला. आता झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाला आहे.
विरोधी पक्षाची नववी विकेट 100 पेक्षा कमी धावांवर पडल्यानंतर टी20 आंतरराष्ट्रीय सामना गमावणारा भारत पहिला पूर्ण सदस्य संघ बनला. झिम्बाब्वेची 9वी विकेट केवळ 90 धावांवर पडली होती.
झिम्बाब्वे संघाला घरच्या मैदानावर इतक्या छोट्या धावसंख्येचा बचाव करता आला नव्हता. 2021 मध्ये या मैदानावर संघाने पाकिस्तानविरुद्ध 118 धावा करून विजय मिळवला होता. आता केवळ 115 धावा करून भारताचा पराभव झाला.
सलामीवीर अभिषेक शर्मा 4 चेंडू खेळून खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. ऋतुराज गायकवाडला 9 चेंडूत केवळ 7 धावा करता आल्या. रियान पराग 2 तर रिंकू सिंग शून्यावर बाद झाला. 22 धावांवर भारताने चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर ध्रुव जुरेल आणि गिलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा जुरेल १४ चेंडूत ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
कर्णधार शुभमन गिलही वैयक्तिक 31 धावांवर बाद झाला. रवी बिश्नोई 9 धावा करून बाद झाला तर आवेश खान 16 धावा करून बाद झाला. आवेशने काही चौकार मारून आशा दाखवली होती पण त्याला विजय मिळवता आला नाही. मुकेश कुमार शून्यावर बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर 34 चेंडूत 27 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय संघाला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती मात्र संघाला केवळ दोन धावा करता आल्या.