IND vs SA: सामन्याआधी खेळाडूंनी पाळले मौन, यजमानांनी हातावर बांधली काळीपट्टी, जाणून घ्या कारण…
भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Ind vs Sa) सेंच्युरियनमध्ये मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली आहे.
सेंच्युरियन: भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Ind vs Sa) सेंच्युरियनमध्ये मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली आहे. आज सामना सुरु होण्याआधी दोन्ही संघातील खेळाडूंनी मैदानावर काही मिनिटं मौन पाळले व दक्षिण आफ्रिकेतील एका महान व्यक्तीमत्वाला श्रद्धांजली वाहिली. दोन्ही टीम्सनी आयुष्यभर वर्णभेदाविरोधात लढणारे दक्षिण आफ्रिकेचे संघर्ष नायक, नोबल शांती पुरस्कार विजेते आणि आफ्रिकेचे माजी आर्चबिशप डेसमंड टूटू (desmond tutu) यांना श्रद्धांजली वाहिली. टूटू यांचे रविवारी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी आर्कबिशप यांच्या सन्मानार्थ दंडावर काळी पट्टी बांधली होती.
कोण होते डेसमंड टूटू? डेसमंड टूटू यांना दक्षिण आफ्रिकेत रंगभेद विरोधाचं प्रतिक म्हणून ओळखलं जातं. त्यांना देशाची नैतिक कम्पास (Country’s Moral Compass) म्हणूनही ओळखलं जातं. त्यांनी नेहमी विवेकवादाची बाजू घेतली. रंगभेदाविरोधात अहिंसक लढा उभारल्याबद्दल त्यांना 1984मध्ये शांततेचा नोबल पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं.
गांधी शांती पुरस्काराने सन्मानित 1986मध्ये केपटाऊनमध्ये ते पहिले आर्चबिशप बनले. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या सरकारशी चर्चा झाल्यानंतर 1990मध्ये नेल्सन मंडेला यांना तुरुंगातून सोडण्यात आलं. त्यानंतर वर्णभेदाविरोधातील कायदा संपुष्टात आणला गेला. 1994 मध्ये विजयी झाल्यानंतर राष्ट्रपती मंडेला यांनी मोठा निर्णय घेतला. वर्णभेदाच्या काळात मानवाधिकाराचं हनन झालं होतं. त्याची चौकशी करण्यासाठीच्या आयोगाचं नेतृत्व डेसमंड यांच्याकडे सोपवण्यात आलं. 2007मध्ये भारत सरकारने डेसमंड यांना गांधी शांती पुरस्कार देऊन गौरवलं होतं.