पुजाराच्या एंट्रीने टीम इंडियातील एका फलंदाजाची झोप उडाली! इंग्लंड विरुद्धच्या सामन्यामध्ये होणार मोठा बदल
टीम इंडियातून डच्चू मिळाल्यानंतर चेतेश्वर पुजारा काउंटी खेळण्यासाठी इंग्लंडला गेला. ससेक्समध्ये पुजाराने पाच सामन्यात आठ डावात 720 धावा केल्या.
मुंबई: मागच्या काही महिन्यांपासून खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar pujara) पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळवलं आहे. इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी चेतेश्वर पुजाराची भारतीय संघात निवड झाली आहे. पुजाराच्या समावेशामुळे टीम इंडियातील त्याचा सहकारी आणि कसोटी फलंदाज हनुमा विहारीची (Hanuma Vihari) झोप नक्कीच उडाली असेल. पुजाराच्या समावेशानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाच्या (Team India) फलंदाजी क्रमवारीत बदल होतील. काही खेळाडूंना संघाबाहेर सुद्धा करण्यात येऊ शकतं. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी चेतेश्वर पुजाराला संधी मिळाली नव्हती. त्याच्याजागी हनुमा विहारी तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. आता चेतेश्वर पुजाराने पुनरागमन केलं आहे. त्यामुळे विहारीच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल होणं स्वाभाविक आहे. “मी फ्लेक्सिबल आहे. मी कुठल्याही स्थानावर खेळू शकतो. मी अनेकदा टॉप ऑर्डरमध्ये, तर काही वेळा खालच्या क्रमांकावर फलंदाजी सुद्धा केली आहे. माझ्यासाठी केवळ खेळाची परिस्थिती महत्त्वाची आहे” असं हनुमा विहारीने हिंदुस्तानशी बोलताना सांगितलं.
काउंटीमध्ये खेळण्याचा पुजाराला फायदा मिळाला
टीम इंडियातून डच्चू मिळाल्यानंतर चेतेश्वर पुजारा काउंटी खेळण्यासाठी इंग्लंडला गेला. ससेक्समध्ये पुजाराने पाच सामन्यात आठ डावात 720 धावा केल्या. यात द्विशतकही आहे. त्याची हीच कामगिरी निवड समितीने लक्षात घेतली, व त्याला कसोटी संघात स्थान दिलं. मागच्यावर्षीच्या कसोटी मालिकेतील बाकी राहिलेला कसोटी सामना आता खेळणार आहे. संघात निवड झाल्यानंतर पुजारा म्हणाला होता की, “इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठी माझी निवड झाली. मी आनंदात आहे. माझी काउंटी क्रिकेटमधली कामगिरी लक्षात घेतली, त्याचा मला आनंद आहे”
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विहारी हिरो
मागच्यावर्षी 2020-21 मध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विहारी हिरो ठरला होता. अश्विन सोबत मिळून फलंदाजी करताना त्याने सिडनी कसोटी ड्रॉ केली होती. त्यानंतर हॅमस्ट्रिंगच्या इंजरीमुळे तो बाकीचे सामने खेळू शकला नाही. इंग्लंड विरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 ने पुढे आहे. त्यांच्याकडे इतिहास रचण्याची संधी आहे.