IND VS SA: कॅप्टन कोहली २९ वर्षांपासूनची विजयाची प्रतिक्षा संपवणार, गांगुलीला विश्वास
मागच्या २९ वर्षात भारताने सात वेळा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे. पण एकदाही त्यांना कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.
नवी दिल्ली: कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) थेट बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्याशी पंगा घेतला असला, तरी गांगुली यांनी मात्र विराटच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. वादांच्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेमध्ये दाखल झाली आहे. भारतीय संघ या दौऱ्यात तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला यंदा इतिहास रचण्याची संधी आहे. भारताला आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेत एकदाही मालिका विजय मिळवता आलेला नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यामते, सध्याचा भारतीय संघ मजबूत असून ते मालिका विजयाची प्रतिक्षा संपवतील.
टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराटने घेतलेली पत्रकार परिषद स्फोटक ठरली. सौरव गांगुलींच्या विश्वासहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं. गांगुली आणि कोहलीमधील मतभेद समोर आले. या सगळ्या गोष्टींचा टीम इंडियावर परिणाम होणार नाही, असे गांगुली यांना वाटते.
कोहली दक्षिण आफ्रिकेतील इतिहास बदलणार? सौरव गांगुली गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “भारताला यावेळी दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे. दक्षिण आफ्रिकन भूमीवर मागच्या २९ वर्षात भारताला एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.” “यंदा अपयशाची ही मालिका खंडित करण्याचा विराट कोहलीचा प्रयत्न असेल” असे गांगुली म्हणाले. रोहित शर्मा, रविंद्र जाडेजा हे प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे दौऱ्यावर जाणार नाहीयत. त्यामुळे संघाच्या अडचणी वाढू शकतात. मागच्या २९ वर्षात भारताने सात वेळा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आहे. पण एकदाही त्यांना कसोटी मालिका जिंकता आलेली नाही.
संबंधित बातम्या: India south Africa Tour Video : जोहान्सबर्गला जाताना विमानात विराटने इशांत शर्माला डिवचलं विराट, गेलला जमलं नाही, ते पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने करुन दाखवलं, बाबर म्हणाला…. विराट कोहलीच्या स्फोटक वक्तव्यांवर अखेर सौरव गांगुलीने सोडलं मौन