IND vs BAN 2nd ODI Result: रोहित शर्मा लढला, पण टीम इंडियाने सीरीज गमावली
IND vs BAN 2nd ODI Result: बांग्लादेशकडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी आहे.
ढाका: दुसऱ्या वनडे मध्ये टीम इंडियाचा अवघ्या 5 रन्सनी पराभव झाला. टीम इंडियाने अखेरच्या चेंडूपर्यंत लढत दिली. जखमी रोहित शर्मा अखेरपर्यंत मैदानावर उभा होता. त्याच्या बॅटिंगमुळे टीम इंडियाच्या विजयाची आस निर्माण झाली होती. शेवटच्या चेंडूवर 6 रन्सची गरज होती. पण रोहितला षटकार मारता आला नाही. बांग्लादेशने विजयासाठी 272 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने 9 बाद 266 धावा केल्या. रोहितने 28 चेंडूत नाबाद 51 धावा फटकावल्या. यात 3 चौकार आणि 5 षटकार होते.
मेहेदी हसन मिराज बांग्लादेशच्या विजयाचा हिरो
मेहेदी हसन मिराज बांग्लादेशच्या विजयाचा नायक आहे. तो आठव्या नंबरवर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने शानदार शतक ठोकलं. बांग्लादेशने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. बांग्लादेशने सलग दुसऱ्यांदा आपल्या देशात टीम इंडियाला वनडे सीरीजमध्ये हरवलं. याआधी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशने टीम इंडियाला 2-1 ने हरवलं होतं. सीरीजमधला तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी होईल. प्रतिष्ठेच्या दृष्टीने टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे.
टीम इंडियाकडून कोणी धावा केल्या?
बांग्लादेशने पहिली बॅटिंग केली. निर्धारित 50 ओव्हर्समध्ये सात विकेट गमावून 271 धावा केल्या. मेहदी मिराजने 83 चेंडूत 100 धावा केल्या. त्याने आठ चौकार आणि चार षटकार लगावले. महमुदुल्लाहने 96 चेंडूत 77 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 82 आणि अक्षर पटेलने 56 धावा केल्या. अखेरीस रोहित शर्माने झुंजार खेळ दाखवला. त्यामुळे विजयाची शक्यता निर्माण झाली होती.