IND vs ENG: दुसऱ्या वनडेत टीम इंडियाची वाट लावणाऱ्या Reece Topley ची गोष्ट, पीटरसनमुळे डोक्याला पडले होते टाके
IND vs ENG: रीस टॉपलीने (Reece Topley) दुसऱ्या वनडे मॅच मध्ये भारताच्या बॅटिग ऑर्डरची पार वाट लावून टाकली. त्याने 10 षटकात 24 धावा देत सहा विकेट काढल्या. 2 निर्धाव षटकं टाकली.
मुंबई: रीस टॉपलीने (Reece Topley) दुसऱ्या वनडे मॅच मध्ये भारताच्या बॅटिग ऑर्डरची पार वाट लावून टाकली. त्याने 10 षटकात 24 धावा देत सहा विकेट काढल्या. 2 निर्धाव षटकं टाकली. इंग्लंडच्या 247 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा डाव (IND vs ENG) 146 धावात आटोपला. 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण करणाऱ्या रीस टॉपलीच हे करीयरमधलं सर्वोत्तम प्रदर्शन आहे. टॉपलीच्या गोलंदाजीची आज सर्वत्र चर्चा होत आहे. वेग, अचूक टप्पा आणि स्विंग (Swing) चेंडुंनी काल त्याने भारतीय फलंदाजांना हैराण केलं. त्याच्या गोलंदाजीचं भारतीय फलंदाजांकडे उत्तर नव्हतं. 6 फूट 5 इंच उंचीचा रीस टॉपली सर्वप्रथम वयाच्या 15 व्या वर्षी चर्चेत आला होता. 2009 टी 20 वर्ल्ड कपच्या वेळी तो नेट बॉलर होता. केविन पीटरसनने मारलेला ड्राइव त्याच्या डोक्य़ावर आदळला होता. डोक्याला बॉल लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. त्याच्या डोक्याला टाके पडले होते.
लहान मुलाच्या वॉर्ड मध्ये ठेवलं होतं
पीटरसनने मारलेला फटका रीस टॉपलीला इतका जोरात लागला होता की, रुग्णालयात असताना त्याने प्रचंड वेदना सहन केल्या. टॉपलीला लहान मुलाच्या वॉर्ड मध्ये ठेवलं होतं. त्याची शरीरयष्टी त्या बेड मध्ये मावत नव्हती. कालच्या सामन्यात रीस टॉपलीने भेदक गोलंदाजीच प्रदर्शन केलं. त्याने रोहित शर्मा, शिखर धवन, सूर्युकुमार. यादव, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या विकेट काढल्या.
रोहित शर्मा-ऋषभ पंतला हैराण केलं
त्याने आपल्या गोलंदाजीने रोहित शर्मा आणि ऋषभ पंतला चांगलचं हैराण केलं. रोहित शर्माला त्याने खातही उघडू दिलं नाही. शुन्यावरच पॅव्हेलियन मध्ये पाठवलं. तिसऱ्या टी 20 सामन्यात रोहित टॉपलीच्याच गोलंदाजीवर 11 धावांवर आऊट झाला होता. तिसऱ्या टी 20 सामन्यात ऋषभ पंतला 1 रन्सवर आऊट केलं होतं. तिसऱ्या टी 20 सामन्यात त्याने 22 धावा देऊन तीन विकेट काढल्या होत्या.