IND vs ENG: रोहित शर्मा-विराट कोहलीने मर्यादा ओलांडल्या, BCCI चे पदाधिकारी भडकले
भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये दाखल (India England Tour) झाला आहे. टीम इंडियाने लीस्टरशर मध्ये सरावही सुरु केलाय. 24 जूनला सराव सामना आहे.
मुंबई: भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये दाखल (India England Tour) झाला आहे. टीम इंडियाने लीस्टरशर मध्ये सरावही सुरु केलाय. 24 जूनला सराव सामना आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. मात्र त्याचवेळी रोहित शर्मा, विराट कोहलीच्या (Virat kohli) कृतीवर बीसीसीआय (BCCI) नाराज असल्याचीही चर्चा आहे. चाहत्यांसोबत फोटो काढणं, हे बीसीसीआयच्या नाराजीमागचं मुख्य कारण आहे. लंडनमध्ये दाखल झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली तिथल्या रस्त्यांवर फिरताना दिसले. शॉपिंगसाठी म्हणून ते बाहेर पडले होते. यावेळी चाहत्यांनीही त्यांच्यासोबत फोटो काढले. रोहित आणि विराट दोघांनी मास्क घातलं नव्हतं. त्यावर बीसीसीआयने चिंता व्यक्त केली आहे. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धूमल यांनी या मुद्दावर खेळाडूंशी चर्चा करण्यात येईल, असं सांगतिलं. ब्रिटनमध्ये कोविडचा धोका कमी झालाय. मात्र, तरीही खेळाडूंनी खबरदारी घेणं आवश्यक आहे, असं अरुण धूमल इनसाइट स्पोर्टशी बोलताना म्हणाले.
न्यूझीलंडच्या संघालाही कोरोनाचा फटका
इंग्लंड दौऱ्यावर बायोबबल नाहीय. पण तिथे कोरोना संपलेला नाही. ब्रिटनमध्ये दररोज 10 हजारपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण होतेय. अलीकडेच न्यूझीलंडच्या संघाचही कोरोनामुळे नुकसान झालं. त्यांचा कॅप्टन केन विलियमसन, टॉम लॅथम, डेवन कॉन्वे यांना कोरोनाची लागण झाली. न्यूझीलंडचा संघ कसोटी मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. आपले खेळाडू कोरोनाच्या संपर्कात येऊ नयेत, हीच बीसीसीआयची इच्छा आहे. कारण इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे. त्यानंतर टी 20 आणि वनडे सीरीजही होणार आहे.
कोरोनामुळे पाचवी कसोटी झाली होती स्थगित
एजबॅस्टन येथे भारत आणि इंग्लंडमध्ये मालिकेतील पाचवा कसोटी सामना होणार आहे. मागच्यावर्षी कोविड मुळे ही मॅच रद्द झाली होती. मागच्यावर्षी रवी शास्त्री यांच्या बुक लॉन्चच्या कार्यक्रमानंतर त्यांना स्वत:ला कोविडची बाधा झाली होती. कोचिंग स्टाफमध्येही कोरोनाचे संक्रमण झाले होते. त्यानंतर रोहित शर्मा-विराट कोहली या खेळाडूंनी पाचवी कसोटी खेळायला नकार दिला होता.