IND vs ENG 1st 20: Rohit Sharma चा वर्ल्ड रेकॉर्ड, विजयी रथावर स्वार भारतीय कॅप्टनने आधी करोना नंतर इंग्रजांना हरवलं
IND vs ENG 1st 20: कोरोनावर मात करुन मैदानात परतलेल्या रोहित शर्माने (Rohit sharma) पहिल्याच टी 20 सामन्यात इंग्लंडला 50 धावांनी नमवलं.
मुंबई: कोरोनावर मात करुन मैदानात परतलेल्या रोहित शर्माने (Rohit sharma) पहिल्याच टी 20 सामन्यात इंग्लंडला 50 धावांनी नमवलं. कोरोनामुळे रोहित शर्माला इंग्लंड विरुद्ध एजबॅस्टन कसोटीत (Edgebaston Test) खेळता आलं नव्हतं. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर काल त्याने मैदानावर पुनरागमन केलं. एजबॅस्टन कसोटीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहितच्या नेतृत्वाखाली पहिल्या टी 20 सामन्यात भारतीय संघाने कमालीच प्रदर्शन केलं. इंग्लंडवर एकतर्फी विजय मिळवला. त्याच बरोबर रोहितने वर्ल्ड रेकॉर्डही (World Record) बनवला. सलग 13 टी 20 सामने जिंकणारा रोहित शर्मा टी 20 क्रिकेटच्या इतिहासातील पहिला कर्णधार बनला आहे.
म्हणून रोहित यशस्वी कॅप्टन
याआधी हे रेकॉर्ड अफगाणिस्तानच्या असगर अफगाण आणि रोमानियाच्या रमेश सतीसनच्या नावावर होता. त्यांनी टी 20 मध्ये सलग 12 सामने जिंकले होते. रोहितच्या नेतृत्वाखाली सर्वच फॉर्मेटमध्ये भारताचा हा 15 वा विजय आहे. रोहितने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 मध्ये 14 चेंडूत 24 धावा फटकावल्या. यात 5 चौकार होते. कर्णधार म्हणून परदेश भूमीवर रोहित शर्माची ही पहिली सीरीज आहे. मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप नंतर विराट कोहलीने संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाने तिन्ही फॉर्मेटसाठी रोहित शर्माची कर्णधारपदी निवड केली.
धोनी, विराट नंतर अशी कामगिरी करणारा रोहित
रोहित शर्मा एमएस धोनी आणि विराट कोहलीनंतर टी 20 मध्ये 1000 धावा पूर्ण करणारा तिसरा भारतीय कर्णधार बनला आहे. टी 20 मध्ये हजार धावा पूर्ण करणारा रोहित जागतिक क्रिकेटमधील दहावा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाचा एरॉन फिंच 65 सामन्यात 1971 धावांसह टॉपवर आहे. भारतीय सलामीवीरांची नियमित कर्णधार म्हणून ही पाचवी सीरीज आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंके विरुद्धच्या टी 20 मालिकेत क्लीन स्वीप विजय मिळवला आहे. परदेशातील ही पहिलीच मालिका आहे. वनडे मध्ये वेस्ट इंडिज आणि कसोटीत श्रीलंकेवर विजय मिळवलाय.