IND vs ENG: रोहित-द्रविड जोडीने मॅच विनर खेळाडूला बसवलं बाहेर, टीम इंडियाच्या सिलेक्शनबद्दल जाणून घ्या पाच महत्त्वाचे पॉइंटस
इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे एजबॅस्टन कसोटी खेळू न शकणारा रोहित शर्माच (Rohit Sharma) दोन्ही टीमचा कॅप्टन आहे.
मुंबई: इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे एजबॅस्टन कसोटी खेळू न शकणारा रोहित शर्माच (Rohit Sharma) दोन्ही टीमचा कॅप्टन आहे. 1 जुलैपासून म्हणजे आजपासून कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर टी 20 सामन्यांची मालिका. कसोटी संघात खेळणाऱ्या खेळाडूंना आराम मिळेल, याची बीसीसीआयने (BCCI) संघ निवड करताना काळजी घेतली आहे. म्हणूनच टी 20 साठी दोन संघ निवडण्यात आले आहेत. कसोटी संघातील सिनीयर खेळाडूंना पहिल्या टी 20 साठी आराम दिला आहे. आयर्लंड विरुद्ध सीरीज जिंकणारा संघ पहिल्या टी 20 साठी कायम ठेवण्यात आला आहे. मजबूत संघ शेवटच्या दोन टी 20 मध्ये उतरवला जाणार आहे. टी 20 साठी संघ निवडताना खेळाडूंची कामगिरी लक्षात घेतली आहे. वनडे टीम निवडताना कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा यांनी एक चूक केलीय. संघातून मॅच विनर खेळाडूला बाहेर केलय. संघ निवडीबद्दल जाणून घ्या पाच महत्त्वाचे पॉइंट्स.
- वनडे सीरीजसाठी मॅच विनर खेळाडूला संघात स्थान दिलेलं नाही. दीपक हुड्डाला वनडे संघात स्थान दिलेलं नाही. दीपक हुड्डा शानदार फॉर्म मध्ये आहे. आयर्लंड विरुद्धच्या सीरीजमध्ये तो मॅच विनर ठरला होता. पहिल्या टी 20 मध्ये त्याने नाबाद 47 तर दुसऱ्या टी 20 सामन्यात त्याने 104 धावांची शतकी खेळी केली. त्याशिवाय आयपीएल सीजनमध्ये त्याने 15 सामन्यात 451 धावा केल्या होत्या. त्याच्यामुळे फिरकी गोलंदाजीचा पर्याय सुद्धा उपलब्ध होतो. अशा खेळाडूला इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात स्थान मिळालेलं नाही.
- गुजरात टायटन्सला आयपीएलच जेतेपद त्यानंतर आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामन्याची सीरीज जिंकून देणाऱ्या हार्दिक पंड्याने वनडे टीम मध्ये कमबॅक केलं आहे. हार्दिक पंड्याने शेवटचा वनडे सामना 23 जुलै 2021 रोजी श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. हार्दिक शिवाय शिखर धवननेही वनडे टीम मध्ये कमबॅक केलं आहे. धवनने आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करुनही दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड विरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी त्याची संघात निवड झाली नव्हती. यावर्षी फेब्रुवारी मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध शिखर धवन शेवटचा वनडे सामना खेळला होता.
- रवींद्र जाडेजा भारतासाठी शेवटचा वनडे सामना डिसेंबर 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. तेव्हापासून तो वनडे टीम बाहेरच आहे. इंग्लंड विरुद्धच्या 3 वनडे सामन्यासाठी त्याला संघात स्थान मिळालय.
- अर्शदीप सिंह हा वनडे टीम मधला नवीन चेहरा आहे. मागच्या काही सीजनपासून त्याने पंजाब किंग्ससाठी दमदार कामगिरी केली आहे. आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामन्यासाठी संघात त्याची निवड झाली होती. पण प्लेइंग 11 मध्ये संधी नाही मिळाली. आता इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.
- राहुल त्रिपाठीने आयपीएल 2022 चा सीजन गाजवला. त्याची सुद्धा आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामन्यासाठी संघात निवड झाली होती. पण प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. आता इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 साठी त्याची आणि संजू सॅमसनची निवड झाली आहे.